अकोला : वीजबिल भरण्यास काणाडोळा करणाऱ्या सहा हजारावर थकबाकीदार ग्राहकांना महावितरणने ‘शॉक’ दिला आहे. अकोला परिमंडळांतर्गत महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली असून वीजबिल भरणार नाही, तर वीजही मिळणार नाही, अशा धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. वारंवार सूचना देऊनही बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील सहा हजार ३८७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिली.

अकोला परिमंडळात वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण समोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक व इतर वर्गवारीतील ११ लाख ६७ हजार १८२ ग्राहकांकडे जानेवारी महिन्याचे चालू बिल धरून ३४५ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्यापैकी जानेवारी महिन्यात ११२ कोटी रुपये वसूल झाले आहे. अद्याप २३३ कोटी थकीत आहेत.

यात अकोला जिल्ह्यातील चार लाख १६ हजार ३३७ ग्राहकांकडे १२६ कोटी ६३ लाख आहे. वसुली मात्र ४६ कोटी ४५ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील पाच लाख २९ हजार ६८२ ग्राहकांकडे १५९ कोटी ७२ लाख एकूण थकबाकी असतांना वसुली ४६ कोटी ३१ लाख रुपये आहे. वाशीम जिल्ह्यातील दोन लाख २१ हजार १६३ ग्राहकांकडे ५८ कोटी ७९ लाख रुपयांची थकबाकी असतांना जानेवारी महिन्यात केवळ १८ कोटी ९५ लाख रुपये वसूल झाले. वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीज बिल न भरल्याने महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महावितरणने कठोर भूमिका घेत आता थकबाकीदारांची वीज जोडणी खंडित करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक वीज जोडणी तोडल्या

जानेवारी महिन्यात अकोला जिल्ह्यातील एक हजार ३२१, बुलढाणा जिल्ह्यातील चार हजार ३५२ आणि वाशीम जिल्ह्यातील ७१४ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

थकबाकीमुळे महावितरण अडचणीत

वीज ग्राहकांकडे थकबाकीचा डोंगर झाल्याने महावितरणच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सर्व वर्गवारीतील ग्राहकांना वीज बिल भरण्याच्या सूचना वारंवार दिल्यानंतरही ग्राहकांकडून त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे थकबाकीचा आकडा चांगलाच फुगला आहे. वसुलीचे मोठे आव्हान महावितरण पुढे असून या मोहिमेला वेग देण्यात आला आहे. आगामी ही मोहीम तीव्र करण्यात येईल, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.