नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक एकचे दोन भागात विभाजन; ३८ कर्मचारी वाढून वीज सेवा सक्षम
महावितरणच्या वतीने नागपूर जिल्ह्य़ातील वीज ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याकरिता नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक एकचे दोन विभागात विभाजन करून एक नवीन विभाग तयार करण्याचा निर्णय झाल्याचे पत्र महावितरणच्या नागपूर कार्यालयात नुकतेच धडकले आहे. नवीन विभागात वर्ग १ ते ४ पर्यंतच्या ३८ नवीन कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळाल्याने निश्चितच येथील लक्षावधी वीज ग्राहकांना चांगल्या सेवा मिळतील. या नवीन विभागामुळे नागपूर ग्रामीण येथील एकूण विभागांची संख्या चारवर पोहचून वीज ग्राहकांच्या या भागातील बऱ्याच समस्या निकाली निघतील.
महावितरणच्या नागपूर परिमंडळात गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शहर, नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक १, नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक २ आणि काटोल असे तीन विभाग होते. ग्रामीण भागात एकोणवीस उपविभागांचा समावेश होता. या सगळ्याच विभागात लक्षावधी वीज ग्राहकांची संख्या व भौगोलिक विस्तार बघता, ग्राहकांना वीजपुरवठा व सेवा देताना नागपूर ग्रामीण विभागाची चांगलीच दमछाक होत होती. निश्चितच या प्रकारामुळे बरेचदा ग्राहकांना विलंबाने सेवा मिळत असल्याने महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना संतप्त नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत होते. हा प्रश्न निकाली काढण्याकरिता नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक १ चे विभाजन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून वीज ग्राहकांकडून महावितरणसह ऊर्जामंत्र्यांकडे केली जात होती.
राजकीय पुढाऱ्यांच्या मागणीवरून तसा प्रस्तावही महावितरणच्या मुख्यालयाकडे पाठवला गेला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून नवीन विभाग तयार करण्याचा निर्णय झाला आहे. त्याअंतर्गत जुन्या विभागाचे नाव मौदा विभाग ठेवत नवीन भागाचे नाव नागपूर ग्रामीण विभाग क्रमांक १ असे जुन्या नावाने ठेवले गेले आहे. विभाजनाचे आदेश नुकतेच महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून हे आदेश ३ फेब्रुवारीला नागपूरच्या कार्यालयाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवनिर्मित नागपूर ग्रामीण क्रमांक १ विभागाकरिता वर्ग १ ते ४ पर्यंतच्या नवीन ३८ कर्मचाऱ्यांच्या पदांना मंजुरी मिळाली असून त्यात ३६ कायम व २ पदे आऊटसोर्सिगच्या माध्यमातून भरले जाणार आहेत. नवीन पदांमुळे निश्चितच येथील ग्राहकांना चांगली वीज सेवा मिळेल.

नवीन मंजूर पदे
कार्यकारी अभियंता- १, अतिरिक्त कार्यकारी अभियंता- १, उपकार्यकारी अभियंता- १, सहाय्यक अभियंता- ४, उपव्यवस्थापक (मासं)- १, उपव्यवस्थापक (विवले)- २, सहाय्यक लेखापाल- २, उच्चस्तर लिपिक (मासं)- २, उच्चस्तर लिपिक (लेखा) ३, लघुटंकलेखक- १, निम्मस्तर लिपिक (मासं)- २, निम्मस्तर लिपिक (लेखा)- ४, मुख्य तंत्रज्ञ- १, वरिष्ठ तंत्रज्ञ- २, तंत्रज्ञ- २, कनिष्ठ तंत्रज्ञ- ५, शिपाई- २, कंत्राटी पद्धतीचे निम्मस्तर लिपिक- १, कंत्राटी शिपाई- १

नवीन निर्णयानुसार विभाग
मौदा विभाग
* कन्हान उपविभाग
* रामटेक उपविभाग
* मौदा उपविभाग
* कामठी उपविभाग
नवनिर्मित नागपूर ग्रामीण विभाग- १
* कुही उपविभाग
* उमरेड उपविभाग
* भिवापूर उपविभाग
* नागपूर ग्रामीण- १ उपविभाग (गोधनी, बेसा, हुडकेश्वर, दिघोरी, वाडीसह इतर परिसर)

नागपूर (ग्रा.) विभाग- २
* कळमेश्वर उपविभाग
* खापा उपविभाग
* खापरखेडा उपविभाग
* पारशिवनी उपविभाग
* सावनेर उपविभाग
काटोल विभाग
* काटोल उपविभाग
* जलालखेडा उपविभाग
* सावरगाव उपविभाग
* मोहपा उपविभाग
* कोंढाळी उपविभाग
* नरखेड उपविभाग