नागपूर : दिवसा मुबलक उपलब्ध होणारी सौरऊर्जा साठवून संध्याकाळच्या वीजटंचाईवर मात करता येऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर महावितरणने प्रत्यक्ष कृतीतून दिले आहे. राज्यात सायंकाळी विजेची मागणी वाढत असताना बॅटरीमध्ये साठवलेली वीज ग्राहकांच्या मदतीला धावून येत आहे. विकेंद्रित पद्धतीने बॅटरीच्या माध्यमातून १००० मेगावॅट अवर वीजपुरवठ्याचा टप्पा गाठणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली आहे. आगामी उन्हाळ्यात या प्रकल्पाचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
बॅटरीतून वीजपुरवठ्याचा हा टप्पा महत्त्वाचा का?
सौरऊर्जेची निर्मिती प्रामुख्याने दिवसा होते. मात्र, संध्याकाळी सूर्यास्तानंतर सौरऊर्जेचा पुरवठा बंद होतो आणि विजेची मागणी कायम राहते. अशा वेळी अन्य स्रोतांकडून तुलनेने महाग दराने वीज खरेदी करावी लागते. दिवसा निर्माण झालेली अतिरिक्त सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून ती संध्याकाळी वापरल्यास महागड्या विजेवरील अवलंबित्व कमी करता येते. महावितरणच्या बॅटरी साठवणूक प्रकल्पामुळे हाच पर्याय उपलब्ध झाला आहे.
सध्या किती वीज साठवण्याची क्षमता कार्यान्वित झाली आहे?
महावितरणच्या बॅटरी ऊर्जा साठवणूक योजनेअंतर्गत ५०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था कार्यान्वित झाली आहे. या व्यवस्थेतून दोन तास वीजपुरवठा शक्य असल्याने एकूण १००० मेगावॅट अवर ऊर्जेची उपलब्धता निर्माण झाली आहे. राज्यातील ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. विकेंद्रित वीज वितरण जाळ्याशी जोडलेल्या या प्रकल्पांमुळे गरजेच्या वेळी वीज उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.
या योजनेचा सर्वसामान्य ग्राहकांना काय फायदा होणार?
एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने ऑक्टोबरमध्ये उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. परिणामी विजेची मागणी वाढली आहे. दिवसा सौरऊर्जेतून किफायतशीर वीज उपलब्ध होते; मात्र संध्याकाळी मागणी वाढल्यानंतर महागडी वीज खरेदी करण्याची वेळ येते. बॅटरीत साठवलेली वीज या काळात वापरल्यास वीजपुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.
पुढील विस्ताराचे नियोजन काय?
महावितरणने एकूण ७५० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक व्यवस्था उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यातून दोन तासांत १५०० मेगावॅट अवर वीज उपलब्ध होऊ शकेल. त्यापैकी १००० मेगावॅट अवरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय ४००० मेगावॅट अवर क्षमतेच्या प्रकल्पांचे कामही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत आतापर्यंत सुमारे ७००० मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प सुरू झाले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र यांनी या कामगिरीची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. बॅटरी साठवणुकीमुळे नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढविण्यासोबतच संध्याकाळच्या उच्चांकी मागणीच्या वेळी तुलनेने किफायतशीर वीज उपलब्ध करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
