नागपूर: कर्मचारी नसलेल्या एका छायाचित्रकाराला उपचारासाठी महावितरणच्या अधिकारी कर्मचा-यांनी आठवड्याभरात १.१० लाखांची रोख मदत केली. या छायाचित्रकाराचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले. तो आर्थिक विवंचनात असल्याचे कळताच अधिकारी- कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला.
मार्टिन असे छायाचित्रकाराचे नाव आहे. महावितरणचे नागपुरातील कोणतेही कार्यालय असो तेथे छायाचित्रकार मार्टिनच असेल असे समीकरण गेल्या ३० वर्षांपासून आहे. मार्टिननेही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच नव्हे तर मनमिळाऊ स्वभावातून महावितरणच्या कर्मचाऱ्यां मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. उत्कृष्ट छायाचित्रांसाठी सर्वांनाच मार्टिनच हवा होता. मार्टिनचे दोन्ही मुत्रपिंड निकामी झाले. त्याला आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावे लागते. तसेच औषधोपचारासाठी मोठा खर्च लागतो. हा खर्च करताना त्याची दमछाक होत होती. त्याची ही गंभीर अवस्था बघून महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले.




हेही वाचा >>>बुलढाणा: ट्रॅक्टर-दुचाकीची धडक; दोन ठार, डोणगावनजीकची दुर्घटना
मधुसूदन मराठे व इतर अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आठवड्याभरात १.१० लाख रुपये रोख जमा करून मार्टिनच्या स्वाधीन केले.याप्रसंगी शरद दाहेदार, हरीश गजबे, प्रमोद खुळे, रुपेश देशमुख, डॉ. संदीप केने, प्रवीण स्थूल, अशोक सावंत, अविनाश सहारे, अमित परांजपे व इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. मार्टिनला यापुढेही मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.