अमरावती: राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबत चालल्याने उष्णतेचा त्रास वाढला आहे. तापमान वाढल्याने विजेचा वापरही वाढला असून अनेक भागांत वीज मागणीचा ताण जाणवत आहे. अशा परिस्थितीत महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेला अनेक ठिकाणी नागरिकांकडून विरोध होताना दिसत आहे. अशातच महावितरणने सवलतीविषयी स्पष्टीकरण दिले आहे.

अशी मिळू शकते सवलत

जुन्या मीटरच्या जागी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट मीटर बसविण्यात येत असून त्यातून ग्राहकांना विविध सुविधा मिळणार असल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे. महावितरणच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ८५ पैशांपर्यंत सवलत मिळू शकते. तसेच हे मीटर पूर्णपणे मोफत असून पोस्टपेड स्वरूपाचे आहेत.

अमरावती परिमंडळात १.६५ कोटींची सवलत

स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमुळे घरगुती वीज ग्राहकांना दिवसा वीज वापरावर मिळणाऱ्या सवलतीचा लाभ वाढत असून, अमरावती परिमंडळातील ग्राहकांना एप्रिल ते जून २०२६ या तीन महिन्यांत तब्बल १ कोटी ६५ लाख ११ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे.

एप्रिलपासून सवलतीच्या रकमेत वाढ

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या नव्या वीजदरानुसार, दिवसा वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, १ जुलै २०२५ पासून या सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळण्यास सुरुवात झाली. जुलै २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रति युनिट ८० पैशांची सवलत देण्यात येत होती. एप्रिल २०२६ पासून ही सवलत वाढवून प्रति युनिट ८५ पैसे करण्यात आली आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

तीन महिन्यांत मिळाली ही सवलत

अमरावती परिमंडळातील सुमारे ५ लाख ५६ हजार ग्राहकांना एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत ही सवलत मिळाली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ग्राहकांना १ कोटी १२ लाख ५६ हजार रुपयांची, तर यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख २८ हजार ग्राहकांना ५२ लाख ५४ हजार रुपयांची सवलत मिळाली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत वीज वापरावर सवलत मिळत असल्याने वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर आणि इतर अधिक वीज वापरणारी उपकरणे या वेळेत वापरल्यास ग्राहकांना आर्थिक लाभ होत आहे.