नागपूर : राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेमुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर महावितरणने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज जोडणी प्रीपेड होणार नाही. ग्राहकांची बिल भरण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच पोस्टपेड राहणार आहे, असे महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांना २४ तासांच्या अल्टिमेटमच्या नोटिसा देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा मुद्दा अखिल भारतीय ग्राहक पंचायतने उपस्थित करत अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी केली आहे.

स्मार्ट मीटर प्रीपेड होणार आहेत का?

स्मार्ट मीटर बसविल्यानंतरही वीज बिलाची पद्धत बदलणार नाही. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच पोस्टपेड पद्धतीनेच वीज बिल भरावे लागेल. स्मार्ट मीटर प्रीपेड करण्यात येणार नसल्याचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी स्पष्ट केले.

मग स्मार्ट मीटरचा नेमका फायदा काय?

स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वापराची आणि बिलाची अद्ययावत माहिती तत्काळ उपलब्ध होईल. त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे, वीज बचत करणे आणि बिलातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

२४ तासांच्या नोटिसांबाबत ग्राहक पंचायतने काय आक्षेप घेतला?

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांची भेट घेऊन ग्राहकांना पाठविल्या जाणाऱ्या २४ तासांच्या नोटिसांवर तीव्र आक्षेप नोंदविला. या नोटिसांमधील कारवाईची भाषा आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या इशाऱ्यांमुळे ग्राहकांमध्ये भीती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा नोटिसा तातडीने बंद कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

महावितरणने वीज चोरीबाबत काय भूमिका मांडली?

राजेश नाईक म्हणाले, स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होईल. वीज चोरीला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा त्यात सहकार्य करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

ग्राहकांच्या शंका कशा दूर केल्या जाणार?

महावितरणकडून विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्राहकांनी मागणी केल्यास अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.

वीजबिल वाढण्यामागे आणखी कोणती कारणे असू शकतात?

सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांनी घरातील अर्थिंग, अंतर्गत विद्युत जोडणी आणि तारा व्यवस्थित आहेत का, याची तपासणी करावी. अर्थिंग किंवा विद्युत जोडणीतील दोषांमुळेही वीजबिल वाढू शकते, असे मुख्य अभियंता नाईक यांनी स्पष्ट केले.

बैठकीला कोण उपस्थित होते?

या बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सदस्य गजानन पांडे, नागपूर शहर कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी, नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे, महानगर सचिव राजू पुरसेटकर, सहसचिव समीर जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ग्राहक पंचायतची अंतिम मागणी काय?

स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणने ग्राहकांशी थेट संवाद साधावा, जनजागृती वाढवावी आणि मीटर बसविताना कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.