नागपूर : घराचे वीजदेयक कमी करण्यासाठी छतावर सौर प्रकल्प बसविण्याचा विचार असेल, तर महावितरणची ‘स्मार्ट’ योजना फायदेशीर ठरू शकते. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे पात्र ग्राहकांना अवघ्या अडीच हजार ते १० हजार रुपयांच्या लाभार्थी हिश्श्यात एक किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविता येणार आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतून २८ हजार ८८४ अर्ज आले असून, १६ हजारांहून अधिक ग्राहकांचे अंदाजपत्रक तयार झाले आहे. मात्र, अंदाजपत्रक मिळाले म्हणजे लाभ निश्चित झाला असे नाही. शुल्क भरण्यास उशीर झाल्यास संधी हुकू शकते. नेमका नियम काय, कोण पात्र आहे आणि किती पैसे भरावे लागणार? जाणून घेऊया…

‘स्मार्ट’ योजना नेमकी काय?

‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप’ अर्थात ‘स्मार्ट’ योजनेत सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती ग्राहकांना अत्यल्प खर्चात घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविता येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळून ८० ते ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार असल्याने ग्राहकाला प्रकल्पाचा संपूर्ण खर्च करावा लागणार नाही.

किती ग्राहकांनी अर्ज केले?

नागपूर परिमंडळात योजनेसाठी २८ हजार ८८४ ग्राहकांनी अर्ज केले आहेत. त्यात नागपूर जिल्ह्यातील १८ हजार ७, तर वर्धा जिल्ह्यातील १० हजार ८७७ ग्राहकांचा समावेश आहे.

किती जणांचे अंदाजपत्रक तयार झाले?

प्राप्त अर्जांपैकी १६ हजार ९३२ ग्राहकांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ११ हजार २२९, तर वर्धा जिल्ह्यातील ५ हजार ७०१ ग्राहक आहेत.

अंदाजपत्रक मिळाले म्हणजे लाभ निश्चित झाला का?

नाही. योजनेसाठी लाभार्थ्यांची ठरावीक संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रथम शुल्क भरणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. ही संख्या पूर्ण झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार झालेले असले तरी संबंधित अर्जदाराला शुल्क भरता येणार नाही. त्यामुळे अंदाजपत्रक मिळालेल्या पात्र ग्राहकांनी विलंब न करता शुल्क भरावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

कोणाला किती पैसे भरावे लागतील?

३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना केवळ २,५०० रुपये, अनुसूचित जाती-जमातीच्या ग्राहकांना ५,००० रुपये, तर इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गातील ग्राहकांना १०,००० रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे.

पात्रतेची महत्त्वाची अट काय?

ग्राहकाचा सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील सरासरी वीजवापर १०० युनिटपर्यंत असणे बंधनकारक आहे. पात्र ग्राहकांच्या घरावर एक किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसविला जाणार आहे.

सौर प्रकल्पाचा फायदा किती?

महावितरणच्या माहितीनुसार, या योजनेमुळे घरगुती ग्राहकांना दरमहा १०० ते १२० युनिटपर्यंत वीज सौर प्रकल्पातून उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. दिवसा सौर पॅनेलमधून तयार होणारी वीज थेट घरगुती वापरासाठी मिळेल. त्यामुळे वीजदेयकातील खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापरालाही प्रोत्साहन मिळणार आहे.