नागपूर : स्मार्ट मीटरपासून ऑनलाइन सेवांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविणाऱ्या महावितरणच्या संकेतस्थळावरच महत्त्वाची माहिती अद्ययावत नसल्याचे समोर आले आहे. मासिक वीजखरेदी खर्चाची माहिती फेब्रुवारी २०२६पर्यंत, तर पॉवर एक्स्चेंजमधील खरेदीचा तपशील मार्च २०२६पर्यंतच उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, चालू २०२६-२७ आर्थिक वर्षातील अल्पकालीन वीजखरेदीची माहितीही दिसत नाही. त्यामुळे कोट्यवधी ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने चालू वर्षात किती आणि कशी वीज खरेदी केली, याची माहिती ग्राहकांना संकेतस्थळावरून मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महावितरणच्या संकेतस्थळावर नेमकी कोणती माहिती जुनी आहे?

मासिक वीजखरेदी खर्चाच्या विभागात फेब्रुवारी २०२६नंतरची माहिती उपलब्ध नाही. महावितरण विविध स्रोतांतून मोठ्या प्रमाणावर वीज खरेदी करते. त्यामुळे या खर्चाची नियमित माहिती ग्राहकांसाठी महत्त्वाची ठरते.

चालू आर्थिक वर्षातील अल्पकालीन वीजखरेदीचा तपशील आहे का?

अल्पकालीन वीजखरेदीच्या विभागात २०२५-२६पर्यंतची माहिती दिसते. मात्र, २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाची नोंद उपलब्ध नाही.

पॉवर एक्स्चेंजमधील वीजखरेदीची स्थिती काय?

या विभागात मार्च २०२६पर्यंतची माहिती आहे. त्यामुळे २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा तपशील उपलब्ध होतो. मात्र, एप्रिल २०२६पासून चालू आर्थिक वर्षात पॉवर एक्स्चेंजमधून किती वीज खरेदी झाली, याची माहिती संकेतस्थळावर दिसत नाही.

वीजहानी आणि नियामक व्यवहारांची माहिती अद्ययावत आहे का?

महावितरणने दाखल केलेल्या याचिकांच्या विभागात अलीकडच्या वर्षांतील माहिती दिसत नाही. प्रत्यक्ष वितरण आणि एकूण तांत्रिक व व्यावसायिक हानीची माहितीही २०२४-२५ नंतर संबंधित विभागात उपलब्ध नाही. पुढील वर्षांची हानीची लक्ष्ये मात्र अन्य नियामक कागदपत्रांत आहेत.

ग्राहक संघटनेचे म्हणणे काय?

अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे यांनी वीजखरेदीसह महत्त्वाची माहिती वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांच्या मनात कंपनीच्या कामकाजाबाबत संशय निर्माण होऊ शकतो, असे सांगत सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याची मागणी केली.

महावितरणने काय स्पष्टीकरण दिले?

महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी कंपनीचे कामकाज पारदर्शी असून वेळोवेळी सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जाते, असे सांगितले. संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत नसल्याची तक्रार अद्याप प्राप्त झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.