नागपूर : स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत महावितरणने ग्राहकांच्या भ्रमनध्वनीवर संदेश पाठवल्यावर अनेक ग्राहक व विविध संघटना संतापल्या आहे. या संदेशानंतर नागपूरसह राज्यभरहात स्मार्ट मीटरविरोधात पून्हा आंदोलन सुरू झाले आहे. त्यातच महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल वाढत असल्याचा दावा चुकीचा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. उन्हाळ्यात एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने वीज वापर वाढतो आणि त्यामुळेच बिल जास्त येते, स्मार्ट मीटरचा त्याच्याशी संबंध नसल्याचा दावा महावितरणने केला आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते का?
नाही, असे महावितरणचे म्हणणे आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते, हा दावा चुकीचा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. मीटर केवळ प्रत्यक्ष वीज वापराची अचूक नोंद करतो.
मग अनेकांचे वीज बिल वाढल्याची तक्रार का आहे?
महावितरणच्या मते, उन्हाळ्यात एसी, कुलर, पंखे आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे वीज वापर वाढून बिल जास्त येते. याचा स्मार्ट मीटरशी कोणताही संबंध नाही.
स्मार्ट मीटरचे फायदे काय आहेत?
स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची माहिती रिअल-टाइममध्ये उपलब्ध होते. मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने मीटर रीडिंगमधील चुका टळतात आणि बिलिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होते.
दिवसा वीज वापरल्यास सवलत मिळते का?
होय. महावितरणच्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ८५ पैशांपर्यंत सवलत मिळू शकते. त्यामुळे वीज बिलात बचत होण्याची संधी आहे.
स्मार्ट मीटर सुरक्षित आहेत का?
महावितरणच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बीआयएस मान्यताप्राप्त असून ते एएमआय तंत्रज्ञानावर आधारित आहेत. सायबर सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून हे मीटर कार्यरत आहेत.
स्मार्ट मीटरसाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागतात का?
नाही. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पधारकांना याचा फायदा होतो का?
होय. स्मार्ट मीटरमुळे वीज निर्मिती आणि वापर यांचे अचूक मोजमाप मिळत असल्याने सौर ऊर्जा प्रकल्पाची क्षमता आणि प्रत्यक्ष वापर यांचा ताळमेळ ठेवणे सोपे होते.
महावितरणने ग्राहकांना काय आवाहन केले आहे?
स्मार्ट मीटरबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे. शंका असल्यास ग्राहकांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
