नागपूर : ‘लाईनमन’ म्हटले की वीजयंत्रणेची दुरुस्ती करताना खांबावर चढलेला पुरुष कर्मचारी डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र महावितरणच्या नागपूर परिमंडळातील दीपाली खोब्रागडे या त्या प्रतिमेला अपवाद ठरल्या आहेत. राष्ट्रीय लाईनमन दिनानिमित्त दिल्लीत त्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होणार आहे. राज्यातून निवडलेल्या चार कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न १ : ‘लाईनमन’ हा शब्द परंपरेने पुरुषांशी जोडला जातो. आपण या क्षेत्रात येण्याचा निर्णय कसा घेतला? सुरुवातीला कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या?
‘लाईनमन’ हे पुरूष अथवा महिला या दोघांपैकी एका वर्गाशी जोडलेले पद नाही. वीज क्षेत्रात लाईन हेल्परपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत प्रत्येक कर्मचारी हा महावितरणचा लाईनमनच असतो. या क्षेत्रात महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मला सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळे आणि आव्हानात्मक करायचे होते. ज्या कामांकडे पाहून लोक घाबरतात, ते करून दाखवायची माझी जिद्द होती. माझ्या लाईनमन बनण्याच्या निर्णयाचे अनेक सहकाऱ्यांनी कौतुक केले. कुटुंबाने तर प्रत्येक पावलावर खंबीर साथ दिली, असे दीपाली खोब्रागडे म्हणाली.
प्रश्न २ : ग्रामीण भागात सात वर्षे काम करताना कोणती आव्हाने सर्वाधिक कठीण वाटली? एखादा संस्मरणीय प्रसंग सांगाल का?
ग्रामीण भागात काम करताना रात्री-अपरात्री होणारे ब्रेकडाऊन हाताळणे हे मोठे आव्हान होते. अहिल्यानगर जिल्हामधील कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख तसेच रवंदा शाखा कार्यालयात काम करताना कृषीपासून औद्योगिक ग्राहकांपर्यंत सर्वांशी संवाद साधावा लागला. माझ्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण म्हणजे अभिनेता आमिर खान यांच्या ‘तेजस्विनी’ टीममध्ये निवड होणे आणि ‘कोविड योद्धा’ पुरस्कार मिळणे. ते क्षण आजही मला प्रेरणा देतात. मागील पाच वर्षांपासून मी नागपूर येथे कार्यरत आहे, असे दीपाली यांनी सांगितले.
प्रश्न ३ : उंच खांब, उच्चदाब वीजवाहिन्या आणि जोखमीचे काम – एक महिला म्हणून आपण या कामाकडे कसे पाहता? भीतीवर कशी मात करता?
काम करताना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन हीच माझी खरी ताकद आहे. जोखमीचे काम हाती घेण्यापूर्वी मी काही क्षण मानसिक तयारी करते. त्यामुळे काम अधिक आत्मविश्वासाने करता येते. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य नेहमीच मोलाचे ठरते. ग्राहकांकडूनही एक महिला कर्मचारी म्हणून आदराची वागणूक मिळते. त्यामुळे भीतीचे सावट कधीच जाणवत नाही, असे दीपाली स्पष्ट करतात.
प्रश्न ४ : महिला कर्मचाऱ्यांसाठी या क्षेत्रात कोणत्या सुविधा किंवा बदलांची गरज आहे, असे आपल्याला वाटते?
महावितरणकडून कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेतली जाते. मात्र, बदलांची आवश्यकता असल्यास ती ग्राहकांच्या पातळीवर अधिक आहे. वीजसुरक्षेबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता आणि साक्षरता वाढवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अपघात टळतील आणि आमचे काम अधिक सुरक्षित होईल, असे त्या सांगतात.
प्रश्न ५ : ‘सुरक्षा प्रथम’ हा दृष्टिकोन आपल्या दैनंदिन कामात कसा रुजला?
‘सुरक्षा प्रथम’ हे माझ्यासाठी केवळ ब्रीदवाक्य नाही, तर ती एक प्रतिज्ञा आहे. कामाला सुरुवात करताना मी स्वतःशी सुरक्षिततेची प्रतिज्ञा करते. सहकाऱ्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करते. सूक्ष्म नियोजन, जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हीच माझी कार्यपद्धती आहे, असे त्या नमूद करतात.
प्रश्न ६ : ऊर्जा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणींना आपण काय संदेश द्याल?
कोणत्याही कामाला घाबरू नका. ‘मी महिला आहे’ ही भावना मनातून काढून टाका. प्रत्येक क्षेत्रात आपण पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, हा आत्मविश्वास बाळगा. महावितरण ही आशियातील सर्वात मोठ्या वीज वितरण कंपन्यांपैकी एक असून, ग्राहकसेवेची मोठी संधी येथे मिळते. जिद्दीने पुढे या आणि आपल्या कामातून समाजासाठी उत्तम सेवा निर्माण करा, असा संदेश दीपाली देतात. दिल्लीत होणारा राष्ट्रीय सन्मान हा केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून महावितरणमधील प्रत्येक महिला कर्मचाऱ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणींना प्रेरणा मिळेल, यात शंका नाही.
