नागपूर : शासनाकडून विविध विभागाचे सुधारीत आकृतीबंध तयार करण्यात येत आहे. महसूल विभागातील आकृतीबंधात उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे कमी दाखवण्यात आल्याने नाराजीचा सूर आहे. आता महिला व बाल कल्याण विभागाच्या आकृतीबंधावरून अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काहींच्या फायद्यासाठी हा आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामुळे महिला व बाल विकास अधिकारी संवर्गातील अनेक जण पदोन्नती न मिळताच निवृत्त होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

महिला व बाल विकास विभागाचा तब्बल २३ वर्षांनंतर तयार करण्यात आलेला सुधारित आकृतिबंध वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सामान्य प्रशासन विभागाने ठरवलेल्या पदोन्नतीच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, यामुळे निम्म्याहून अधिक अधिकारी पदोन्नती न मिळताच निवृत्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, विभागात तीव्र नाराजी पसरली आहे.

नव्या आकृतिबंधात महिला व बाल विकास अधिकारी व सहायक आयुक्तांची एकूण १९५ पदे मंजूर करण्यात आली आहे, तर पदोन्नतीने भरल्या जाणाऱ्या उपायुक्त पदांची संख्या केवळ १५ ठेवण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार किमान ३३ टक्के पदे पदोन्नतीसाठी राखीव ठेवणे अपेक्षित असताना, या निकषाचे पालन न झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विभागीय संघटना आणि आयुक्तांनी उपायुक्त पदांची संख्या ५१ करण्याची शिफारस केली होती. मात्र, ती नाकारून सध्याचा आकृतिबंध मंजूर करण्यात आला. यामुळे १५ ते २० वर्षे सेवा बजावूनही अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळाली नाही आणि नव्या रचनेमुळे भविष्यातील संधीही संपुष्टात आल्याची भावना व्यक्त होत आहे. काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी हा आकृतिबंध तयार केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. यासंदर्भात विभागाचे सचिव अनुप यादव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अधिकारी-कर्मचारी प्रमाणात विसंगती

नवीन आकृतिबंधातील आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण. प्रत्येक महसुली विभागाच्या मुख्यालयात विभागीय उपायुक्त कार्यालयासाठी दहा अधिकाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र त्यांना सहाय्य करण्यासाठी केवळ तीन कर्मचाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार एका अधिकाऱ्यामागे किमान तीन कर्मचारी अपेक्षित असताना येथे उलट चित्र दिसत असल्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

दुरुस्तीसाठी मंत्री, सचिवांना निवेदन

आकृतिबंधात अनेक त्रुटी आहेत. भविष्यात पदोन्नती संदर्भात तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. पदोन्नतीची पदेही निकषांनुसार नाहीत. या दुरुस्तीसाठी मंत्री आणि सचिवांना निवेदन दिले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती, ठाण्याचे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी व महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग, राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोसले यांनी दिली.