नागपूर : विदर्भाच्या औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणारा महिंद्रा अँड महिंद्राचा मोठा प्रकल्प नागपुरात आकार घेण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. अतिरिक्त बुटीबोरी येथे प्रस्तावित १,५०० एकरवरील वाहन आणि ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे ८०० एकर जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया पुढे सरकली आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे वर्षाला किती वाहने तयार होणार आणि रोजगारासाठी कोणाला संधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
नागपुरात नेमका किती मोठा प्रकल्प उभारला जाणार?
महिंद्राचा हा हरितक्षेत्र प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरीतील सुमारे १,५०० एकर जागेवर विकसित केला जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा देशातील महिंद्राचा सर्वात मोठा सर्वसमावेशक वाहन आणि ट्रॅक्टर निर्मिती प्रकल्प असेल. पहिल्या टप्प्यात सुमारे ८०० एकर जमीन ताब्यात घेण्याच्या दिशेने कंपनीची प्रक्रिया सुरू आहे.
वर्षाला किती वाहने आणि ट्रॅक्टर तयार होणार?
प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे दरवर्षी ५ लाख वाहने आणि १ लाख ट्रॅक्टर, अशी एकूण सहा लाख वाहनांची उत्पादन क्षमता असेल. विविध प्रकारच्या ऊर्जास्रोतांवर चालणारी तसेच भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित वाहने येथे तयार करण्याचे नियोजन आहे.
संभाजीनगरमध्ये काय उभारणार?
नागपूरच्या प्रकल्पाला पूरक म्हणून संभाजीनगरमध्ये १५० एकरवर पुरवठादार उद्यान उभारले जाणार आहे. येथून नागपूरच्या नव्या प्रकल्पाबरोबरच चाकण आणि नाशिकमधील महिंद्राच्या विद्यमान प्रकल्पांनाही विविध सुटे भाग पुरविले जाणार आहेत.
नागपुरातील रोजगाराबाबत काय नियोजन आहे?
प्रकल्पासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर कंपनीने भर दिला आहे. यासाठी नागपुरात स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र उभारण्याची योजना आहे. यामध्ये यांत्रिक कामकाज, वेल्डिंग आणि रंगकामासह वाहननिर्मितीसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नोकरीसाठी कोणाला संधी मिळणार?
महिंद्राच्या विद्यमान प्रकल्पांतील अनुभवी कर्मचाऱ्यांनाही नव्या प्रकल्पातील विविध पदांसाठी पुढील दोन ते तीन वर्षांत निवड प्रक्रियेत सहभागी होता येईल. तांत्रिक क्षमता, प्रत्यक्ष कामातील वर्तन, कंपनीच्या मूल्यांशी सुसंगतता आणि सांघिक कामाची क्षमता या निकषांवर निवड केली जाणार आहे. नवीन रोजगारांची नेमकी संख्या मात्र कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. प्रकल्प पुढे जाईल तसतशी मनुष्यबळाची गरज, उपलब्ध रोजगार आणि निवड प्रक्रियेची माहिती जाहीर केली जाणार असल्याचे महिंद्राने स्पष्ट केले आहे.
