गडचिरोली : जिल्ह्यात तीन दशकापासून दारूबंदी असतानाही तस्करांकडून नवनवीन शक्कल लढवून मद्याची अवैध वाहतूक सुरूच आहे. मात्र, पोलिसांनी या तस्करांचे मनसुबे उधळून लावत एटापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका आलिशान महिंद्रा थार गाडीतून होणारी मद्य तस्करी पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा
मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२६ रोजी एटापल्ली पोलिसांना एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी मद्याची मोठी खेप एटापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तस्करी केली जाणार आहे. या माहितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एटापल्ली येथील पोलीस पथकाने विविध मार्गांवरून सापळा रचला. तपास पथक पाळत ठेवून असतानाच, संशयित महिंद्रा थार गाडी (क्रमांक एम.एच ३२ ए.एस. ७०९९) नारानूर आणि ताडपल्लीमार्गे लांझी गावाच्या दिशेने येताना दिसली. पोलिसांनी तत्काळ वाहन अडवून त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्यात मद्याचा साठा लपवून ठेवल्याचे उघड झाले.
तस्करीसाठी महागडे वाहन
वाहनाच्या तपासणीत पोलिसांना ‘रॉकेट देशी दारू संत्रा’ कंपनीच्या २९ सीलबंद पेट्या आणि एक पेटी बिअर असा एकूण २ लाख ९० हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा मिळून आला. यासह तस्करीसाठी वापरण्यात आलेली १२ लाख रुपये किमतीची महिंद्रा थार गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. अशा प्रकारे एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतला.
आरोपीवर गुन्हा
या प्रकरणी मयुर विजय बालमवार (वय २७, रा. वार्ड क्र. ७, गडचिरोली) या आरोपीविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ८३ आणि मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे करत आहेत. सदरची यशस्वी कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्लीचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे व त्यांच्या पथकाने पार पाडली. जिल्ह्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशीच कठोर मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
