भंडारा : बाळविक्री प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. नितेश बाजपेयी याला भंडारा पोलिसांनी आज, गुरुवारी संध्याकाळी अटक केली. या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.

उपचाराच्या नावाखाली एका चिमुकलीला नागपूरला पाठवत असल्याचे सांगून मध्यस्थांच्या मदतीने तिची तीन लाखांत विक्री केल्याचे प्रकरण ३ फेब्रुवारीला उघडकीस आले होते. याप्रकरणी गोंदिया येथील न्यू बालाजी क्लिनिकचे संचालक डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यातील दोन आरोपींना यापूर्वीच अटक झाली. मुख्य आरोपी बाजपेयीचा पोलिसांकडून शोध सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्येचा प्रयत्न करीत स्वतःला जखमी करून घेतले होते. भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, १७ फेब्रुवारीला आरोपी डॉ. बाजपेयी याचा अटकपूर्व जामीन अर्ज भंडारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. यानंतर डॉक्टरांनी तो ‘फीट’ असल्याचे स्पष्ट करताच गुरुवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.