|चंद्रशेखर बोबडे,
फळगळतीमुळे संत्री पिकांचे मोठे नुकसान
नागपूर : विदर्भातील संत्री निर्यातीसाठी उत्पादकांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असतानाच यंदा फळगळतीमुळे संत्री बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता उत्पादकांनी वर्तवली आहे. पूर्वी दुबई, नेपाळ, बांगलादेशसह इतर देशातही संत्री पाठवली जात होती. मात्र सध्या बांगलादेशपर्यंतच निर्यात मर्यादित आहे.
विदर्भात मोठ्या प्रमाणात संत्री उत्पादन होत असले तरी त्यावर प्रक्रियेची व्यवस्था नसल्याने बाजारात भाव मिळत नाही. परंतु, उत्पादक व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी प्रयत्न केले. २०१४ मध्ये या प्रयत्नाला चालना मिळाली. केंद्राच्या कृषी प्रक्रिया उत्पादन निर्यात प्राधिकरणाच्या (अपेडा) यादीत संत्रीचा समावेश झाला. दुबई, बांगलादेशसह इतरही देशात संत्री निर्यात होऊ लागली. या भागातील सर्वात मोठा ग्राहक हा बांगलादेश असून तेथे सरासरी एक लाख ५० हजार मे.टनाची निर्यात केली जाते. यात वाढ व्हावी, इतर देशातही संत्री जावी म्हणून प्रयत्न सुरूच आहेत. ‘अपेडा’चे कार्यालय नागपुरात सुरू व्हावे म्हणून अलीकडेच नागपुरात गडकरींच्या उपस्थितीत बैठकही झाली. असे एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे यंदा नैसर्गिक संकटाने त्यात खीळ घातली आहे.
विदर्भात १ लाख २६ हजार हेक्टरमध्ये संत्री लागवड के ली जाते. येथून दरवर्षी सहा ते आठ लाख मे.टन उत्पादन होते.
उन्हाळ्यातील मृग बहारात सरासरी ४ लाख मे.टन. संत्र्याचे उत्पादन होते. परंतु, यंदा झाडांना फुलेच आली नाहीत. केवळ ३० ते ४० टक्केच बागांमध्ये संत्री हाती आली. त्यानंतर अपेक्षा होती हिवाळ्यात येणाऱ्या अंबिया बहाराकडून. परंतु, त्याला हवामान बदलाचा फटका बसला. विदर्भात पावसाला लवकर सुरुवात झाली. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचले. दमट वातावरणामुळे फळांच्या देठांना बुरशी लागली व मोठ्या प्रमाणात फळगळती सुरू झाली. परिणामी, या बहारात २५ टक्केही संत्री हाती येण्याची शक्यता नाही, असे उत्पादक सांगतात.
मृगबहारातील संत्री अद्याप बाजारात यायची असली तरी त्यांची अवस्था बघता ती निर्यातक्षम असण्याची शक्यता कमी आहे. रंग, गोडवा आणि इतरही बाबींवर परिणाम झाल्याने निर्यातीसाठी आवश्यक दर्जेदार संत्री उपलब्ध होणे अवघड आहे, असे संत्री उत्पादकांची संस्था असलेल्या ‘महाऑरेंज’चे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.
फळगळती व अन्य कारणामुळे संत्र्यांच्या दर्जावर परिणाम होतो. पॅके जिंग करताना एखादा हलक्या प्रतीचा संत्रा असेल तर निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे त्याचा इतरही संत्र्यावर परिणाम होतो. त्यामुळे देशांतर्गत व विदेशातही संत्री पाठवताना अडचणी निर्माण होतात, असे श्रमजिवी नागपुरी संत्री उत्पादक कं पनी, वरुडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जिचकार यांनी सांगितले. एकू ण उत्पादनात लहान आकाराच्या संत्रीचे (चुरा) प्रमाण १५ ते २० टक्के आहे. ते कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संत्री गळती थांबवण्यासाठी राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थांनी उपाययोजना कराव्या, नवे संशोधन करावे म्हणून उत्पादकांनी या संस्थेवर दबाव निर्माण केला. त्यानंतर राज्य सरकारही खडबडून जागे झाले. या भागातील काँग्रेस नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय संस्थेतील कृषी वैज्ञानिक, पंजाबराव कृषी विद्यापीठातील कृषी तज्ज्ञांसमवेत संत्री उत्पादकांचे मेळावे घेऊन या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण झालेले नुकसान मोठे असल्याने याचा परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करतात.
‘‘फळगळतीवर कृषी संशोधकांनी समाधान शोधणे गरजेचे आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने निर्यातीसाठी आवश्यक दर्जेदार संत्री मिळणे कठीण होईल.’’ – श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, ‘महाऑरेंज’.
‘‘यंदा मृग बहार आलाच नाही व आंबिया बहाराची संत्री फळगळतीमुळे गेली. त्याचा फटका उत्पादकांना बसला.’’ – अमिताभ पावडे, संत्री उत्पादक व प्रगतिशील शेतकरी.
