Maldhok bird Solapur challenge conservation Forest Department ysh 95 | Loksatta

पाच वर्षांनी सोलापुरात माळढोकचे दर्शन; वनखात्यापुढे संवर्धनाचे आव्हान

देशात केवळ १०० ते १५०च्या संख्येत असणाऱ्या आणि सोलापुरातून जवळजवळ नाहीशा झालेल्या माळढोक पक्ष्याने सोलापुरात शुक्रवारी पुन्हा एकदा दर्शन दिल्याने वनखात्यासह पक्षी अभ्यासकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत.

पाच वर्षांनी सोलापुरात माळढोकचे दर्शन; वनखात्यापुढे संवर्धनाचे आव्हान
पाच वर्षांनी सोलापुरात माळढोकचे दर्शन

नागपूर : देशात केवळ १०० ते १५०च्या संख्येत असणाऱ्या आणि सोलापुरातून जवळजवळ नाहीशा झालेल्या माळढोक पक्ष्याने सोलापुरात शुक्रवारी पुन्हा एकदा दर्शन दिल्याने वनखात्यासह पक्षी अभ्यासकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, त्याच वेळी मूळ अधिवासात स्थिरावण्यासाठी त्याच्या संवर्धनाचे आव्हान वनखात्यापुढे आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नजचे माळढोक अभयारण्य आता नावालाच उरले आहे. तेथे माळढोकच आढळत नसल्याने अभयारण्याची ओळख नाहीशी होते की काय, अशी स्थिती आहे. कधीकाळी या परिसरात ३० माळढोक होते. २०१९-२० मध्ये येथे माळढोक दिसल्याची शेवटची नोंद झाली. त्यामुळे शुक्रवारी येथे माळढोकने दर्शन दिल्यानंतर वन खात्यातील अधिकाऱ्यांसह सर्वानीच समाजमाध्यमावर त्याची चित्रफीत प्रसारित करून आनंद व्यक्त केला. माळढोक अभ्यासकांच्या मते दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माळढोक स्थलांतरित करून येतात. मात्र, तो दरवर्षी येत असेल तर स्थिरावत का नाही? तो परत कुठे जातो? या प्रश्नांची उत्तरेदेखील शोधावी लागणार आहेत. सोलापूर, चंद्रपूर या जिल्ह्यांत त्याचे अस्तित्व होते, पण तेथेही फार क्वचित तो दिसतो.

राज्यातील माळराने संकटग्रस्त आहेत. माळरानाचा सम्राट असलेला माळढोक वाचवण्यात अपयश आले असले तरी अजूनही प्रयत्न केल्यास तो स्थिरावू शकतो. संवर्धनाच्या दृष्टीने त्याच्या अधिवासाचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि व्यापक जनजागृती अत्यावश्यक आहे. 

– यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-07-2022 at 00:46 IST
Next Story
सहा हजार पंपांवर पर्यायी इंधन; उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक