लोकसत्ता टीम

नागपूर: अडीच महिन्यापूर्वी पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीच्या विरहात पतीनेही गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना वाठोडा ठाण्यांतर्गत घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने मुलांना मोठा धक्का बसला आहे. संजय तुळशीराम गुजर (४२) रा. चामट लेआऊट, साईबाबानगर असे मृताचे नाव आहे.

संजय यांना खुशी (१८) आणि १७ वर्षांचा मुलगा आहे. दोघेही शिकत आहेत. बुधवारी दुपारी संजयने राहते घरी छताच्या पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावला. त्यावेळी खुशी घरीच हॉलमध्ये अभ्यास करीत होती. भाऊ कामासाठी बाहेर गेला होता. सायंकाळी ५ वाजता खुशीला शिकवणीला जायचे होते. यामुळे ती तयार होण्यासाठी खोलीत गेली असता वडील गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. तिने शेजारीच राहणाऱ्या काकाच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीसही घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती ‘सुसाईड नोट’ लागले. त्यात संजयने पत्नीच्या विरहात आणि आर्थिक तणावातून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते.

आणखी वाचा-तरुण मुलीच्या आत्महत्येचे दु:ख पचवून वडिलांनी तिचे केले नेत्रदान

पत्नीने प्राशन केले होते विष

संजय पूर्वी मजुरी करीत होते. अनेक दिवसांपासून कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करीत होते. गत २५ एप्रिलला त्यांची पत्नी कोमल हिने विष प्राशन केले होते. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून संजय अधिकच तणावात गेले होते. पत्नीचा वियोग आणि आर्थिक अडचणींमुळे बुधवारी त्यांनी गळफास लावला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.