लोकसत्ता टीम

नागपूर : आजारी मुलीवर उपचारासाठी व्याजाने कर्ज घेतले. मात्र, वेळीच कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या पित्याने अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देवदूत बनून आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तलावात उडी घेऊन त्या युवकाचा जीव वाचवला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली.

अविनाश कोसरे (३२) असे पित्याचे नाव आहे. अविनाशला पत्नी आणि तीन वर्षांची एक मुलगी आहे. तो अमरनगर, मानेवाडा परिसरात राहतो. त्याचे औषधीचे दुकान असून दोघेही पती-पत्नी दुकान चालवितात. जन्मापासूनच मुलगी आजारी आहे. तिच्या औषधोपचारावर बराच खर्च झाला. कर्जाचे डोंगर वाढतच गेले, परंतु मुलगी बरी झाली नाही. कर्ज देणाऱ्यांचा तगादा सुरू झाला. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्यासारखा निर्णय घेतला. तो रविवारी घरून निघाला. थेट अंबाझरी तलाव परिसरात गेला व पाण्यात उडी घेतली.

आणखी वाचा-बुलडाणा : ‘बर्निंग व्हॅन’चा थरार! धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट

अंबाझरी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल प्रशांत गायधने आणि यशवंत धावडे हे जवळच गस्त घालत होते. दोघांनीही लोकांच्या मदतीने तलावातून अविनाशला बाहेर काढले. काही वेळानंतर अविनाश शुध्दीवर आला. त्याला पोलीस ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी अविनाशचे समूपदेशन केले. माहिती मिळताच पत्नी ठाण्यात पोहोचली. पतीला सुखरुप पाहून तिचेही डोळे पाणावले. पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त राहुल मदने आणि ठाणेदार विनायक गोल्हे यांनी कौतुक केले.