लोकसत्ता टीम

नागपूर : लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकारने खून करून तिचा मृतदेह जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी उघडकीस आली असून मानकापूर पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली. त्याने खून केल्याची कबुली दिली असून बुधवारी पुरलेला मृतदेह काढण्यात येणार आहे. महेश केशव वळसकर (५७, रा. न्यू सोमवारीपेठ, सक्करदरा) असे आरोपी प्रियकराचे, तर प्रिया बागडी ऊर्फ प्रिया गुलक (२४) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

प्रिया गेल्या सहा वर्षांपासून फरस, गोधनी येथे कुटुंबापासून वेगळी राहत होती. ती गेल्या १६ तारखेपासून अचानक बेपत्ता झाली. तिचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तिच्या आईने खोलीवर जाऊन बघितले. घराला कुलूप दिसल्याने तिने शेजाऱ्यांकडे चौकशी केली. ती आठवडाभरापासून घरी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आईने मानकापूर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.

आणखी वाचा-वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी प्रियाचे लोकेशन घेऊन तपास करण्यास सांगितले. तिचे शेवटचे लोकेशन रामटेकमधील एका हॉटेलमध्ये मिळून आले. ते हॉटेल आरोपी महेश केशव वळसकर यांच्या मालकीचे होते. महेशसोबत गेल्या आठ वर्षांपासून तिचे प्रेमसंबंध होते. ती नेहमी महेशच्या हॉटेलमध्ये मुक्कामी राहत होती. तिचा संपूर्ण खर्च महेशच करीत होता. गेल्या महिनाभरापासून प्रिया लग्नासाठी महेशमागे तगादा लावत होती. मात्र, विवाहीत असलेला महेश लग्न करण्यास तयार नव्हता.

गळा आवळला अन्…

महेशची दूधाची भूकटी तयार करण्याची कंपनी होती. त्या कंपनीत प्रिया नोकरीवर होती. तेव्हापासून दोघांची ओळख झाली. कंपनीतच दोघांचे प्रेमसंबंध जुळले ते आतापर्यंत कायम होते. गेल्या तीन दिवसांपूर्वी प्रिया ही महेशच्या हॉटेलवर गेली. तिने लग्नासाठी महेशवर दबाव टाकला. त्यामुळे त्याच रात्री महेशनेे तिचा गळा आवळून खून केला. तिला हॉटेलपासून तीन किमी अंतरावर जंगलात पुरले.

आणखी वाचा-नागपूर हिट ॲन्ड रन प्रकरण : बावनकुळे यांच्या पुत्राच्या वाहनाची आरटीओकडून तपासणी

प्रियकरासह ‘त्या’ महिलेचा विष प्राशन करण्याचा प्रयत्न

प्रियाच्या आईने महेशवर संशय व्यक्त केल्यामुळे त्याला मानकापूर पोलिसांनी चौकशीसाठी ठाण्यात आणले. यामुळे तो घाबरला आणि त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेची चौकशी केली असता तिनेही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना वेगळाच संशय आल्याने महेशला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसीखाक्या दाखवताच प्रियाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महेशला अटक केली.