लोकसत्ता टीम

नागपूर : कुटुंबात बाळ जन्माला आले की हर्षोल्लाचे वातावरण असते. हा आनंद साजरा करण्यात बाळाचे वडील आघाडीवर असतात. मात्र नागपूरमध्ये वडिलांनीच आपल्या एका दिवसाच्या बाळाची हत्या केली. याप्रकरणी आरोपी वडिलाला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात आरोपीने हे कृत्य केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश जी.पी.देशमुख यांनी आरोपीला ही शिक्षा सुनावली आहे.

अमरावती जिल्ह्यातील सावर्डी, नांदगाव पेठ येथील रहिवासी असलेला आरोपी गिरीश गोंडाणे (३२) आणि त्यांची पत्नी प्रतीक्षा (२५) यांचा २०२१ मध्ये प्रेमविवाह झाला. लग्नानंतर तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे व्हायची. दरम्यान, प्रतीक्षा गरोदर झाली. गरोदरपणात तिची प्रकृती ढासळल्याने तिला अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे प्रतीक्षाने एका मुलाला जन्म दिला.

आणखी वाचा-अमरावती : पोलिसांच्‍या हातावर तुरी देऊन कैद्याचे रुग्‍णालयातून पलायन

प्रसूतीनंतर प्रतीक्षाला वॉर्ड क्रमांक ४६ मध्ये हलवण्यात आले. ३१ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास तिचा पती गिरीश रुग्णालयात आला आणि प्रतीक्षाच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊन पुन्हा तिच्याशी भांडण करू लागला. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्यानंतर त्याने रागाच्या भरात एका दिवसाच्या बाळाला जमिनीवर फेकून दिले. रुग्णालयात उपस्थित परिचारिकांनी तात्काळ बाळाल अतिदक्षता विभागात हलवले. मात्र उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

प्रतीक्षाची आई जीवनकला मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गिरीशविरोधात गुन्हा नोंदविला. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.टी.खंडारे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी गिरीशविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. विविध पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने त्याला भादंवि कलम ३०२ अन्वये अंतर्गत दहा हजार रुपये दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राज्य शासनाच्यावतीने ॲड. क्रांती शेख (नेवारे) यांनी तर आरोपीच्यावतीने ॲड.एस.जी.गवई यांनी युक्तिवाद केला.