लोकसत्ता टीम

अकोला : कौटुंबिक वादातून पतीने पत्नी व नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील हनुमानवस्ती परिसरात बुधवारी सकाळी घडली. गेल्या आठ दिवसांत दुहेरी हत्याकांडाची ही दुसरी घटना असल्याने शहर हादरले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिष म्हात्रे याचे पत्नीसोबत वाद होते. त्यामुळे पत्नी रश्मी आपल्या नऊ वर्षीय मुलीसह गेल्या पाच वर्षांपासून माहेरी नांदेड येथे राहत होती. म्हात्रे कुटुंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने रश्मी म्हात्रे आपल्या मुलीसह मंगळवारी अकोल्यात आल्या होत्या.

आणखी वाचा-मोदींना शेतकरी नेत्याचा सवाल; म्हणाले, “किती काळ अमेरिका दर…”

दरम्यान, मंगळवारी रात्री पती-पत्नीमध्ये पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. त्याचा राग मनात धरून आरोपीने बुधवारी सकाळी पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून आरोपी पती मनिष म्हात्रे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader