सख्ख्या भावाचा खून झाल्यानंतर त्याच्या विधवा पत्नीवर दीराची विखारी नजर पडली. त्याने गैरफायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. गर्भपात करण्याची वेळ निघून गेल्याने नाईलाजाने बाळाला जन्म दिला. त्या बाळाची आयशा ऊर्फ श्वेता खान हिने टोळीच्या माध्यमातून गुजरातमध्ये विक्री केली. एएचटीयू पथकाने त्या बाळाचा शोध लावला असून आयशावर आणखी एका बाळाच्या विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बाळ विक्री करणाऱ्या टोळीची प्रमुख आयशा ऊर्फ श्वेता खान हिने आतापर्यंत अनेक नवजात बाळांची महाराष्ट्रासह अन्य राज्यात विक्री केली. आतापर्यंत आयशा खानवर कळमना, कोतवाली, अंबाझरी, हुडकेश्वरसह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आयशाने चार दिवसांच्या बाळाची विक्री केल्याचा नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला रिया (३०) ही मध्यप्रदेशातील रहिवाशी असून तिच्या पतीचा गेल्या सहा महिन्यांपूर्वी खून झाला. त्यानंतर तिने उर्वरित आयुष्य सासरी राहण्याची निर्णय घेतला. तिचे कुटुंब मोलमजुरी करतात. गेल्या काही महिन्यांपूर्वी रिया ही कुटुंबीयांसह नागपुरात कामावर आली.
हेही वाचा: सरपंचाने काढली बहिणीची छेड; भावंड पेटून उठले अन् सरपंचाला धु धु धुतले
विधवा वहिनीवर दीराची नजर गेली. त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती झाली. काही दिवसानंतर हा प्रकार लक्षात येईपर्यंत गर्भपात करण्याची वेळ निघून गेली. त्यामुळे बाळाला जन्म देण्यावाचून पर्याय नव्हता. आरोपी सचिन पाटील याने त्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि बाळ दत्तक घेण्याची बतावणी केली. अनैतिक संबंधातून बाळाला दत्तक देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
तोतया डॉक्टर आयशाने केला सौदा
बाळ विक्री करणाऱ्या टोळीची सूत्रधार आयशा ऊर्फ श्वेता खान हिने बाळाला विक्रीचा सौदा गुजरातमधील अहमदाबाद येथील सुलतयानी दाम्पत्याशी केला. ३ लाखांत बाळ देण्याचे ठरले. आयशा हिने गर्भवती रियाला स्वतःच्या घरी नेले. प्रसुती झाल्यानंतर अगदी चार दिवसांच्या बाळाला गुजरातमधील अहमदाबादमधील सुलतयानी दाम्पत्याला विकले. या सौद्यात आयशाचा पती मकबुल खान याचाही महत्त्वाची भूमिका आहे.
हेही वाचा: एसटी’तील पात्रता परीक्षेत पैशांची देवाणघेवाण, तीन अधिकारी निलंबित; महामंडळाची कारवाई
असा लागला गुन्ह्याचा छडा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी आयशाची कसून चौकशी केली. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले. त्यानंतर तिने चार दिवसांच्या बाळाची गुजरातला विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विकलेले बाळ गुजरातमधून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ, सुनील वाकडे, नाना ढोके, राजेंद्र अटकाळे, पल्लवी वंजारी यांनी केली.