-अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर प्रियकर आणि त्याच्या मित्राने एका तरूणीवर बलात्कार केला. दोघांनीही लग्नाचे आमिष दिले होते. परंतु, एकानेही लग्नास होकार न दिल्यामुळे तरूणीच्या तक्रारीवरून त्या युवकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुजात आसीन शर्मा (२२, धरमपेठ) असे प्रियकराचे तर वृषभ गजभीये (२४, चंद्रपूर) असे आरोपी मित्राचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजात शर्मा हा विधी महाविद्यालायात अंतिम वर्षाला शिकतो. त्याची ओळख एका मैत्रिणीच्या माध्यमातून ४ वर्षांपूर्वी पीडित २२ वर्षीय तरूणीशी झाली. काही दिवस एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर दोघेही शिक्षणामुळे वेगवेगळे झाले. गेल्या २६ जानेवारीला ते दोघेही पुन्हा अचानक एकमेकांना भेटले. तेव्हापासून सुजात आणि तरूणी एकमेकांच्या प्रेमात पडले. धनाढ्य असलेल्या सुजात शर्माने तरूणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

सुजातने प्रेयसीला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर त्याने अनेकदा बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तिने काही दिवसांपूर्वी सुजातसमोर लग्नाची अट ठेवली. तेव्हापासून त्याने तिच्याशी टाळाटाळ करीत भेटणे बंद केेले. त्यामुळे तरूणी नैराश्यात गेली. त्याने प्रेयसीला लग्नास नकार देत त्याचा मित्र वृषभ गजभीये याचा मोबाईल क्रमांक देऊन त्याची भेट घालून दिली. तेव्हापासून सुजातला विसरली आणि वृषभच्या प्रेमात पडली.

वृषभने तिला नागपुरातील सदर आणि हिंगणा परिसरात असलेल्या काही हॉटेल्समध्ये नेऊन दारू पाजून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसानंतर दोघेही तिला भेटण्यासाठी टाळाटाळ करायला लागले. तिने दोघांनाही लग्नाची मागणी घातली असता दोघापैकी एकानेही तिला लग्नास होकार दिला नाही. त्यामुळे तरूणीने हिंगणा पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध तक्रार दिली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सुजात शर्माला अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man rape girlfriend with help of friend scsg
First published on: 25-05-2022 at 23:31 IST