सामाजिक जाणीव जपणाऱ्या सहश्रद्ध कर्मयोगी जीवनाची इतिश्री.

शिवशंकरभाऊंच्या निधनामुळे अध्यात्म, समाजकार्याची सांगड घालणारा दीपस्तंभ हरपला

पालखीचे पुजन करताना शिवशंकरभाऊ पाटील

शिवशंकरभाऊंच्या निधनामुळे अध्यात्म, समाजकार्याची सांगड घालणारा दीपस्तंभ हरपला

नागपूर : विदर्भाची पंढरी, संतनगरी, श्री क्षेत्र शेगाव येथील महाराजाधिराज श्री गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांची प्राणज्योत अखेर बुधवारी मालवली. गजानन महाराजांवरील नितांत श्रद्धेतून त्यांनी सामाजिक जाणीव आयुष्यभर तेवढय़ाच तन्मयतेने जपली. अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले. शिक्षण संस्था निर्माण केल्या. धार्मिक संस्थानच्या आदर्श व्यवस्थापनाचा त्यांनी नवा पायंडा पाडला. सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यामुळे त्यांनी शेगाव संस्थान जागतिक स्तरावर नावारूपास आणले. एक मार्गदर्शक, श्रद्धेचा वस्तुपाठ असलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनामुळे ‘श्रीं’ भक्तांमध्ये शोककळा पसरली.

शिवशंकरभाऊ सुखदेव पाटील यांचा जन्म १२ जानेवारी १९४० रोजी झाला. ३१ ऑगस्ट १९६२ मध्ये  भाऊ ंनी संत श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त पद सांभाळले. १९६९ ते १९९० पर्यंत सलग २० वर्षे ते संस्थानचे अध्यक्ष होते. शिवशंकरभाऊ  पाटील सध्या व्यवस्थापकीय विश्वस्त  होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून १९७४ ते १९७९ पर्यंत त्यांनी कार्य केले. शेगाव नगरीच्या विकासासाठी सदैव त्यांची आग्रही भूमिका राहिली आहे. श्री गजानन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवशंकरभाऊ  पाटील यांनी शेगाव येथे संत श्री गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापन केली.

श्री गजानन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण उपलब्ध करून दिले. कर्मयोगी शिवशंकरभाऊ  पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्यांनी आध्यात्मिक व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श  निर्माण केला. त्यांच्या जाण्याने एक तपस्वी, अध्यात्मिक क्षेत्रातील दीपस्तंभ हरपल्याची शोकसंवेदना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

अठराव्या वर्षांपासून मंदिराचे व्यवस्थापन

मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ  पाटील यांच्याकडे वयाच्या अठराव्या वर्षी ‘श्रीं’च्या आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वत:ला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले. विविध सेवाकार्य चालविणारे संत श्री गजानन महाराज संस्थान श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे प्रतीक आहे.  संस्थान व सेवाकार्यात शिवशंकरभाऊ पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.

व्रतस्थ कर्मयोगी

शिवशंकरभाऊ  पाटील हे एक व्रतस्थ आणि कर्मयोगी होते.  संस्थानला सामाजिक कार्याची जोड देत त्यांनी सर्वार्थाने सामाजिक  आणि धार्मिक कार्यात आदर्श निर्माण केला. एक व्रतस्थ कर्मयोगी म्हणून शिवशंकरभाऊ  कायम स्मरणात राहतील.  नितीन गडकरी केंद्रीय मंत्री      

मान्यवरांच्या शोकसंवेदना कर्मयोगाचे मूर्तिमंत रूप

श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तिमंत रूप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशंकरभाऊ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.  मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, श्री संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ  जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरीब आणि वंचिताची सेवाही केली.     उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

कायम स्मरणात राहतील

श्री शिवशंकरभाऊ  पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने एक व्रतस्थ सेवेकरी, मॅनेजमेंट गुरू, निष्काम कर्मयोगी आपण गमावला आहे, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.  शेगावला जायचो तेव्हा अनेकदा त्यांची भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस करायचे, शेगाव संस्थानचे प्रश्न सोडवून घ्यायचे. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्याला हातभार लावण्याची संधी मिळणे हे माझेोाग्य होते. -देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Managing trustee of shegaon sansthan shivshankar patil dies zws

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?
ताज्या बातम्या