नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित लोहखनिज खाण प्रकल्पाला माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ पर्यावरण कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने दिलेल्या मंजुरीबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गंभीर आक्षेप नोंदवले असून, ही मंजुरी तातडीने फेरविचारात घ्यावी, अशी मागणी केली आहे.
मनेका गांधींचा आरोप
मनेका गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, हा निर्णय वन्यजीव, पर्यावरण आणि मानवी अस्तित्वाशी थेट संबंधित असूनही कोणत्या अभ्यासाच्या आधारे आणि कोणत्या निकषांवर मंजुरी देण्यात आली, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. प्रकल्पाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि जैवविविधतेवरील परिणामांबाबत कोणतेही ठोस वैज्ञानिक अभ्यास झाल्याचे दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्हा “टायगर कॅपिटल”
चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्व अधोरेखित करताना मनेका गांधी म्हणतात, “विदर्भातील हा भाग केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात ८० हून अधिक वाघ, बिबटे आणि हजारो लहान-मोठे वन्यप्राणी वास्तव्यास आहेत.”
कोणता इशारा
या प्रकल्पासाठी १८ हजारांहून अधिक झाडांची तोड होणार असून त्यामुळे पर्यावरणीय समतोल पूर्णतः ढासळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. जंगलावर अवलंबून असलेल्या वन्यप्राण्यांचे पुनर्वसन शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर प्राणीमृत्यू आणि मानव–वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
तात्पुरता रोजगार
“हा प्रकल्प रोजगार किंवा विकासाचे कारण म्हणून मांडता येणार नाही. येथे मिळणारा रोजगार तात्पुरता असून दीर्घकालीन नुकसान प्रचंड आहे. हा विकास नसून सरळसरळ विध्वंस आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी लिहिले आहे.
आर्थिक हितसंबंध
विदर्भ आणि महाराष्ट्रातील तापमानवाढ, हवामान बदल, तसेच स्थानिक नागरिकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधत मनेका गांधी यांनी या निर्णयामागे स्वार्थी आर्थिक हितसंबंध असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांना आवाहन
या पत्राच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे की, लोहारडोंगरी लोहखनिज प्रकल्पाला दिलेली मंजुरी तात्काळ रद्द किंवा पुनर्विचारात घ्यावी मंजुरीपूर्वी झालेले अभ्यास, संभाव्य दुष्परिणाम आणि वन्यजीव संरक्षणासाठीची कृती योजना सार्वजनिक करावी. “भारताच्या इतिहासात पर्यावरणाचा विध्वंस रोखणारे नेते कायम स्मरणात राहतात,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून संवेदनशील आणि सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
