नागपूर: विविध क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडापटूंना प्रशिक्षण दिले जाते, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय शासनाकडून केली जाते, रोजगार मिळावा म्हणून सुशिक्षित तरणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. स्पर्धा आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षणाची मालिका इथपर्यंतच मर्यादित नाही. नृत्य स्पर्धेसाठी प्रशिक्षण, सौंदर्य स्पर्धा, गायन, वादन व तत्सम स्पर्धैसाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षणाची सशुल्क सोय केली जाते. स्पर्धा तेथे प्रशिक्षण असे समीकरणच तयार झाले आहे. याच मालिकेत आता श्रावण महिन्यात महिलांकडून साजरी होणारी मंगळागौर व त्यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश झाला आहे. एरवी घराच्या चार भिंतीत साजरा होणाऱ्या धार्मिक विधीलाही उत्सवी स्वरूप आले असून त्याकडही 'इव्हेंट' म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे त्यात रंगत आणायची असेल तर सादरीकरणात नीटनेटकेपणा आणि चुरस निर्माण व्हायला हवीच. म्हणून प्रशिक्षणाची गरज भासू लागली. ती ओळखूनच त्यासाठी ठिकठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जाऊ लागले आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या उपक्रमाला महिलांचाही उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हेही वाचा - गडचिरोली : कबुतर चोरले? चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ… मध्य नागपूरमधील मातृभूमी सेवा फाऊंडेशनद्वारे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत महिलांना १० मिनिटात मंगळागौरीनिमित्त पारंपरिक गीत, खेळ, सांस्कृतिककार्यक्रमाचे सादरीकरण करायचे आहे. आयोजकांनी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहेत. रविवारी राजे तेजसिंगराव भोसले सभागृह तुळशीबाग महाल येथे प्रशिक्षण शिबीर पार पडले. त्यात तब्बल ५०० महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांनी मंगळागौरीच्या विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. मंगळागौरीच्या गाण्याची तालीम घेण्यात आली. अशाच प्रकारचे प्रशिक्षण ७ व ८ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णासाहेब साठे सभागृह, मस्कसाथ बारईपुरा येथे दुपारी १-४ या वेळेत आयोजित केले आहे. हेही वाचा - नागपूर : अपघातात डॉक्टरचा जीव गेला, घटनेच्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वरिष्ठाला अखेर….. राज्य शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची घाई महिलांना झाली आहे. सेतू केद्रावर रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांचा मंगळागौरीच्या स्पर्धा प्रशिक्षणाला मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय म्हणावा असा आहे. स्पर्धेत ११ उत्कुष्ट मंडळांना रोख पुरस्कार, श्रावण क्वीन, उत्कृष्ट निवेदक, असे अनेक पुरस्कार देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी अर्चना डेहनकर, सरिका नांदुरकर, रेखा निमजे, कविता इंगळे, श्वेता निकम (भोसले), निकीता पराये, पदाधिकारी परिश्रम घेत असून स्पर्धेचे संयोजन डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले आहे. नागपुरात सध्या महिला वर्गात या उपक्रमाची चांगलीच चर्चा आहे.