अलीकडे आरक्षणाच्या मागणीमागे राजकीय हेतू स्पष्टपणे दिसून येत असला तरी त्याला सामाजिक चळवळीची किनार असतेच. कुठलाही समाज शंभर टक्के सधन, शिक्षित व प्रगतिशील असू शकत नाही. त्यातही मागास असतात. अशांच्या बाजूने बोलत आरक्षणाची मागणी करणे गैर नाही. ती कायद्याच्या कसोटीवर टिकते की नाही हा वेगळा मुद्दा. तो आजचा विषय नाही. मात्र लोकशाही व्यवस्थेत अशी आंदोलने उभी करताना, ती पुढे नेताना सभ्यतेचे दर्शन घडवणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे व अशा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांचे कर्तव्य. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकारला धारेवर धरणारे मनोज जरांगे त्यापासून कोसो दूर असल्याचे अनेकदा दिसून आले. जरांगे ग्रामीण भागातून समोर आलेले नेते, त्यांच्या भाषेचा तोंडवळा गावपातळीवर बोलल्या जाणाऱ्या बोलीसारखा हे मान्यच, पण म्हणून कुणाचे आईबाप काढण्याचा अधिकारी त्यांना अजिबात नाही. सुरुवातीला त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अशीच भाषा वापरली. त्यांना एकेरीत संबोधले. जातीचा उल्लेख केला. घरात घुसण्याची भाषा केली. आता त्यांच्या रडारवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यांच्या वर्णावरून, रूपावरून टीका करतानाच त्यांच्या आईच्या दुधाचा उल्लेख करण्यापर्यंत जरांगेंची मजल गेली. याचा निषेध करावा तेवढा थोडाच. या जरांगे महोदयांना नेमकी कुणाची फूस हे सारे राज्य जाणते. या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधारी वा विरोधकांमधील नेत्यांना कुणाचे राजकीय हिशेब चुकते करायचे असतील तर ते जरूर करावेत. राजकारणात असे डावपेच खेळले जातात. त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. आहे तो त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या गलिच्छ भाषेवर. आपल्याला राज्यातल्या तमाम मराठा समाजाचे समर्थन आहे, एका हाकेसरशी हा समाज आपल्या पाठीशी उभा ठाकतो, आपण म्हणू तेव्हा रस्त्यावर येतो, सांगू तसे वागतो या भ्रमात जरांगे असतील तर त्यांनी जरूर राहावे. समाजाचे सर्वमान्य नेतृत्व केवळ आपल्याकडेच असा त्यांचा समज असेल तोही त्यांना लखलाभ. म्हणून त्यांना असभ्य भाषा वापरण्याचा अधिकार मिळत नाही. फडणवीस असो की बावनकुळे हे सामान्य जनतेने वारंवार निवडून दिलेले नेते. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजकारणात आहेत. त्यांच्या राजकीय विचाराविषयी, राजकारण करण्याच्या शैलीविषयी अनेकांचे मतभेद असू शकतात. त्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते. मात्र त्यांच्याविषयी अश्लाघ्य भाषा वापरण्याचा अधिकार जरांगेच काय, अन्य कुणालाही नाही.
राजकारण करण्याची पद्धत अलीकडे पार बिघडलेली, त्यात शिव्यांचा वापर सर्रास होऊ लागलेला, यात सत्ताधारी व विरोधक कुणीही मागे हटायला तयार नाहीत. याचा अर्थ सर्वांनीच त्या वाटेवर चालावे असा नाही. जरांगेंनी कधीतरी बावनकुळेंच्या आईंना बघितले काय? कोराडीच्या मंदिरात त्या एक साधे दुकान चालवायच्या याची त्यांना कल्पना आहे काय? मग कशाच्या आधारावर ते त्यांचा उल्लेख करतात? मुलगा कसा दिसतो यावर त्याच्या आईचे प्रेम अवलंबून नसते. तो कसाही असला तरी आईला प्रियच असतो. हा साधा विचार जरांगेंच्या डोक्यात येत नसेल तर त्यांच्या जडणघडणीवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकते. फडणवीसांचे आजवरचे राजकारण कसे राहिले? त्यात जात-धर्मापलीकडची व्यापकता आहे का? त्यांच्यामागे उभा असलेला वर्ग केवळ एकाच जातीचा आहे का याची साधी चाचपणी जरी जरांगेंनी केली तर त्यांची जीभ असे बोलण्यास कधी धजावणार नाही. ते न करता उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार केवळ अशोभनीय नाही तर मूर्खपणाचा. यातून केवळ त्यांच्यातली विकृती दिसते. कुणी कसे दिसावे हे त्याच्या हातात नसते. वंशपरंपरेनुसार जे रंगरूप आपल्याला मिळाले त्याचा स्वीकार करत स्वकर्तृत्वाने समोर जाणे हेच प्रत्येकाच्या हातात असते. या भूतलावरचा प्रत्येक माणूस हाच विचार करून पुढे जातो. जीवनातले हे साधे तत्त्व जरांगेंना ठाऊक नसेल तर त्यांच्यात थोडीही माणुसकी शिल्लक नाही असे खेदाने म्हणावे लागते. आजकाल समोरचा वापरतो म्हणून आम्हीही वापरतो या शब्दात असभ्य भाषेचे समर्थन केले जाते. याचा अर्थ एखादा शेण खातो म्हणून साऱ्यांनीच ते खायचे असा होत नाही. वाईट मार्गाचा अवलंब टाळणे हेच शहाणपण असते.
राज्यातील मराठा समाजाचा विचार केला तर पराक्रम तसेच सामाजिक सुधारणांची मोठी परंपरा या समाजात आहे. अनेक सुधारणावादी चळवळी याच समाजाच्या पुढाकाराने उभ्या राहिल्या. यातून इतर समाजाला सुद्धा परिवर्तनाची दिशा मिळाली. राज्यात असलेल्या अनेक मराठा राजघराण्यांचा इतिहास याची साक्ष पटवतो. मराठे पुढारलेले, राज्याला नेतृत्व देणारे, त्यातून दिशा देणारे अशी ओळख यातून निर्माण झाली व अनेकांनी तो वारसा पुढे नेला. मात्र या समाजातील कुणीही जरांगेंना खडसावण्याची भाषा करत नाही हे खेदजनक. या दोन्ही नेत्यांविरुद्ध जरांगे ज्या पद्धतीने गरळ ओकताहेत ते योग्य नाही असे म्हणण्याची हिंमत हे समाजधुरीण दाखवत नसतील तर जाज्वल्य इतिहासाला काही अर्थच उरत नाही. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक मराठा मंत्री आहेत. त्यांनीही या मुद्यावर तोंड उघडलेले नाही. हा वैदर्भीय नेत्यांविषयीचा दुस्वास समजायचा काय? जरांगेंच्याच मते आरक्षणाचे आंदोलन सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले पाऊल असे गृहीत धरले तर त्यांची वैयक्तिक टीका समर्थनीय कशी ठरू शकते. अशा परिवर्तनवादी चळवळींचा पाया नेहमी वैचारिक असावा लागतो. त्याचा अभाव जरांगेंच्या वर्तनात वारंवार दिसला. दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला वैचारिक बैठक देण्याचा साधा प्रयत्न या समाजातील धुरिणांकडून झाला नाही. आंदोलनकर्त्यांच्या मागे आर्थिक ताकद उभी करणे, साधनसामग्री पुरवणे एवढ्यावरच हे धुरीण समाधानी असल्याचे चित्र वारंवार दिसले. अलीकडच्या काळात आरक्षणाचा मुद्दा फारच संवेदनशील झालेला. मराठ्यांची मागणी तर ओबीसीतून आरक्षण द्या अशी. राज्यात ओबीसींची संख्या सुद्धा लक्षणीय. अशा स्थितीत जे सरकारमध्ये आहेत त्यांना कुठलाही निर्णय घेताना ताकही फुकून प्यावे लागते. ज्यांना सत्ताकारणाची कल्पना आहे त्यांना हे कळते. प्रचंड पाठिंब्यामुळे सध्या हवेत असलेल्या जरांगेंना हे कळत नसावे. म्हणून ते अशी भाषा वापरून स्वत:ची चडफड सिद्ध करतात. जे कुणी या जरांगेंच्या पाठीशी आहेत त्यांनी किमान त्यांच्या भाषादुरुस्तीसाठी तरी कष्ट घ्यावे. पाहुणचार, सरबराई हे प्रत्येक वैदर्भीयांमधले ठळक गुण. विदर्भाचे आतिथ्य काय असते याची कल्पना राज्यातील साऱ्यांना आहे. हेच गुण तुमची भाषा ठरवत असतात. फ्डणवीस व बावनकुळेंना याची जाणीव आहे. म्हणून त्यांना दुबळे समजण्यापेक्षा जरांगेंनी जरा या वैदर्भीय गुणांचा अभ्यास करावा. तेवढीच त्यांच्या अकलेत भर पडेल.
devendra.gawande@expressindia.com
