many birds started coming to india before winter session zws 70 | Loksatta

संकटग्रस्त यादीतील पानटिलवा मुंबईत दाखल ; वेळेपूर्वीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन

महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते.

संकटग्रस्त यादीतील पानटिलवा मुंबईत दाखल ; वेळेपूर्वीच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : हिवाळय़ात स्थलांतरित पक्षी भारतात येतात. पण या वर्षी हिवाळय़ाची चाहूल लागण्याआधी व पावसाळा संपलेला नसताना हे पक्षी भारतात यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत संकटग्रस्त अशी नोंद असलेला काळय़ा शेपटीचा पाणटिलवा (ब्लॅक टेल गॉडविट) हा पक्षी मुंबईत दाखल झाला आहे. मार्च २०२२ मध्ये या पक्ष्याला बीएनएचएसने (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) ‘जीपीएस टॅग’ केले होते.  

महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात होते. या वर्षी पावसाळा अजून संपलेला नाही. मात्र राजधानी मुंबईतील भांडुप पिम्पग स्टेशनमध्ये तो दाखल झाला आहे. ‘आययूसीएन’च्या लाल यादीत तो संकटग्रस्त म्हणून नोंदवला गेला आहे. रशिया ते मुंबई असे मोठे अंतर त्याने अवघ्या पाच दिवसांत पार केले आहे. वेळेआधीच हा पक्षी दाखल झाल्याने पक्षी अभ्यासकांनाही आश्चर्य वाटत असले तरी हवामान बदलाचा हा परिणाम असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. ‘बीएनएचएस’ने मार्च २०२२ मध्ये काळय़ा शेपटीच्या पाणटिलवाला ‘जीपीएस टॅग’ केले होते. हिवाळय़ात तो मुंबईतील ठाणे खाडी परिसरात येतो आणि मार्च महिन्यात परततो.

‘बीएनएचएस’ने ‘टॅगिंग’ केल्यानंतर एप्रिल महिन्यात त्याने ठाणे खाडी परिसर सोडला आणि जून महिन्यात तो सायबेरियाला पोहोचला. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये तो मुंबईत येणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तो वेळेपूर्वीच म्हणजे सप्टेंबरमध्ये परतला. अवघ्या पाच दिवसांत त्याने ४ हजार २०० किलोमीटरचा टप्पा गाठल्याचे ‘जीपीएस टॅग’वरून शास्त्रज्ञांना कळले. सायबेरिया ते मुंबई हा संपूर्ण प्रदेश जमिनीवरचा आहे. पण या पक्ष्याने समुद्रावरून सायबेरिया ते मुंबई हे अंतर कापले असावे, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. समुद्रावरून प्रवासादरम्यान जमिनीवर उतरून, थांबा घेऊन प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे या पक्ष्याने सलग प्रवास केला असावा, असेही अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत ‘बीएनएचएस’च्या शास्त्रज्ञांशी संपर्क होऊ शकला नाही.   

समुद्रमार्गे अवघ्या पाच दिवसांत प्रवास

पक्षी स्थलांतरणाचा अभ्यास असणारे ‘बीएनएचएस’चे पक्षीतज्ज्ञ डॉ. एस. बालचंद्रन यांच्या नावावर ‘जीपीएस टॅग’ करण्यात आलेल्या या पक्ष्याला ‘बाला’ हे नाव देण्यात आले आहे. मुंबई ते दक्षिण-पश्चिम सायबेरिया असा पाच हजार किलोमीटरचा प्रवास त्याने ४७ दिवसांत पूर्ण केला. मात्र परतीचा चार हजार २०० किलोमीटरचा प्रवास त्याने समुद्रमार्गे अवघ्या पाच दिवसांत पूर्ण केला.

हवामान बदलामुळे वेळेआधी किंवा वेळेनंतर पक्षी स्थलांतरित होताना दिसून येत आहेत. गेल्या सात-आठ वर्षांत  हा बदल दिसतोय. बऱ्याचदा स्थलांतरणादरम्यान हे पक्षी थांबून जातात किंवा गेले तर अर्ध्यातूनच परत येतात. प्रजननासाठी योग्य जागा, खाद्य आणि अनुकूल अधिवास असेल तेथे हे थांबतात. पक्ष्यांच्या स्थलांतरणात पावसाळय़ाची भूमिका महत्त्वाची असते आणि या वेळी पावसाळा दरवर्षीच्या तुलनेत उशिरा सुरू झाला.

यादव तरटे-पाटील, पक्षी व वन्यजीव अभ्यासक

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बुलढाणा : करोनाच्या संकट परतून लावल्यानंतर महिला रुग्णालय स्त्री-रुग्णांच्या सेवेत

संबंधित बातम्या

संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट
“आमच्या नितूचा अभ्यास कच्चा” नितेश राणेंविरोधात सुषमा अंधारेंची उपरोधिक टोलेबाजी!
“महिलांनी कपडे घातले नसले तरी…” त्या विधानानंतर बाबा रामदेव यांची माफी
मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू
…अन् आमदार अशोक उईकेंनी कार्यकर्त्याच्या लग्नात धरला ठेका; भन्नाट डान्स पाहून वऱ्हाडी अवाक्

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सुरतमध्ये रोड शोवरील दगडफेकीनंतर केजरीवालांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “२७ वर्षे काम केलं…”
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी