गडचिरोली : देशातील नक्षल चळवळ जवळपास संपुष्टात आल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत असताना छत्तीसगडमधील बस्तरमध्ये नक्षल कमांडर माडवी हिडमा वरील गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे.भूमकाल दिनाच्या कार्यक्रमामध्ये हिडमाचे उदात्तीकरण करणाऱ्या गाण्यावर युवकांनी धरलेल्या ठेक्यावर आता चिंता व्यक्त होत आहे.

सोबतच दंडकारण्याच्या सीमा भागात देखील हिडमावरील गाणे, रिल्स मोठ्या प्रमाणात बघितल्या आणि प्रसारित केल्या जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.बस्तरच्या घनदाट जंगलात एकेकाळी बंदुकीच्या गोळीने होणारा वैचारिक प्रसार आता चक्क स्मार्टफोनच्या ‘स्क्रीन’वर येऊन ठेपला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या भूमकाल दिनाच्या निमित्ताने जगदलपूरमध्ये जो प्रकार घडला, तो केवळ एका तांत्रिक चुकीचा भाग नसून बस्तरमधील बदलत्या संघर्षाचे आणि छुप्या डिजिटल युद्धाचे निदर्शक आहे. नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा, ज्याच्यावर सुरक्षा दलांनी कोट्यवधीचे लाखांचे बक्षीस ठेवले होते आणि ज्याचा ताडमेटलापासून ते झीरम घाटीपर्यंतच्या अनेक क्रूर हल्ल्यांमध्ये सहभाग होता.

दीड महिन्यापूर्वी आंध्रप्रदेश पोलिसांनी एका चकमकीत त्याला ठार केले होते. त्याचे उदात्तीकरण करणारी गाणी चक्क सार्वजनिक रॅलीत वाजवली जाणे, ही व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.हा केवळ ‘डीजे’वर वाजलेल्या गाण्यांचा विषय नाही, तर त्यामागे दडलेल्या ‘अल्गोरिदम’च्या राजकारणाचा भाग आहे, असेही काहींचे मत आहे.

एकेकाळी नक्षलवादी आपले विचार पोहचवण्यासाठी जंगलात फलक, पोस्टर वाटायचे, मात्र आता हेच काम ‘इन्स्टाग्राम रील्स’ आणि ‘यूट्यूब’च्या माध्यमातून होताना दिसत आहे. हिडमाला ‘आदिवासींचा नायक’ म्हणून संबोधणारे करणारे अनेक व्हिडिओ आणि गाणी सध्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हे व्हिडिओ केवळ योगायोग नसून, बस्तरच्या तरुणाईच्या मनात राज्यव्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न आहे, अशी शंका व्यक्त होत आहे.

हिडमाचा इतिहास पाहिला तर तो नक्षलवाद्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गनिमी आर्मी’च्या पहिल्या बटालियनचा प्रमुख होता. सुरक्षा दलांच्या दाव्यानुसार सुकमा जिल्हयातील पुवर्ती गावचा रहिवासी असलेल्या हिडमाने बस्तरमध्ये मोठ्या हिंसाचार घडवीला होता. मात्र, याच हिडमाच्या गावात आंध्र प्रदेशातील काही लोकांकडून त्याचे स्मारक उभारण्याचा प्रयत्न किंवा त्याला ‘हुतात्मा’ असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.

भूमकाल दिनानिमित्त घडलेल्या प्रकारावर आयोजकांनी ही एक ‘तांत्रिक चूक’ असल्याचे सांगत हात झटकले असले, तरीही जनमानसात अशा प्रतिकृतींविषयी असलेले आकर्षण हा खोलवर रुजलेल्या असंतोषाचा पुरावा आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना, वैचारिक पातळीवर ही लढाई अद्यापही प्रलंबित असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.

बंदुकीची नळी शांत करता येईल, पण ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वरून पसरवले जाणारे हे विष रोखणे मोठे आव्हान आहे. बस्तरमध्ये रस्ते आणि वीज पोहचली असली, तरी विश्वासाचे पूल बांधणे अजूनही बाकी आहे. जोपर्यंत विकासाचा प्रकाश शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्याच्या मनात व्यवस्थेबद्दल सुरक्षिततेची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत ‘हिडमा’सारखे हिंसक नायक डिजिटल पडद्यावर चमकतच राहतील, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.