अकोला : मराठा पाटील समाजात लग्न जुळण्यासोबतच घटस्फोटांची समस्या वाढली आहे. त्यामुळे मोठी चिंता निर्माण झाली. यासाठी मराठा पाटील समाज संघटनेने विवाह जुळविण्यासाठी मध्यस्ती समिती व विवाहानंतर निर्माण होणाऱ्या समस्या निवारणार्थ विवाह पश्चात समस्या निवारण समिती निर्माण केली. या समितीच्या माध्यमातून घटस्फोट रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.

लहान विषयाचे भांडवल करून घटस्फोटापर्यंत प्रकरणे

समाजात घटस्फोटाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. अगदी लहान विषयाचे भांडवल करून घटस्फोटापर्यंत प्रकरण पोहचते. यांचे समुपदेशन होणे गरजेचे आहे. समाजातील व्यक्तींनी पुढाकार घेतल्यास अनेक न्यायप्रविष्ठ घटस्फोटाची प्रकरणे मिटवून टाकता येतात. मराठा पाटील संघटनेने यासंदर्भात पुढाकार घेऊन विवाह पश्चात समस्या निवारण समिती स्थापन केली. संघटनेकडे आलेल्या काही प्रकरणांचा निपटारा केला आहे. काही न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांसोबत चर्चा करणे सुरू आहे.

घटस्फोटासाठी विविध कारणे समोर

घटस्फोट प्रकरणांमध्ये असलेली कारणे अतिशय लहान स्वरूपाची असून पती-पत्नीतील अविश्वास, संशय, तर कुठे मान-अपमान, काही प्रकरणात देवाण-घेवाण किंवा उसनवारी अशी कारणे समोर आली आहेत. एक दोन प्रकरणात अडचणीच्या काळात मदत न केल्यामुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचते. पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यास दोन्ही बरोबर समन्वय करून संवाद घडवून आणला जाऊ शकतो. अनेक प्रकरणे मिटू शकतात, असा विश्वास मराठा पाटील संघटनेच्या विवाह पश्चात समस्या निवारण समितीचे अध्यक्ष ॲड. गोपाल गावंडे यांनी व्यक्त केला.

न्यायप्रविष्ठ घटस्फोटांच्या प्रकरणात समन्वय

मराठा पाटील समाजातील न्यायप्रविष्ठ घटस्फोट प्रकरणात समन्वय घडवून आणण्याची इच्छा असणाऱ्या समाजातील व्यक्तींनी अशा प्रकरणाची माहिती मराठा पाटील संघटनेचे विवाह पश्चात समस्या निवारण समितीकडे द्यावी. समितीकडून पती-पत्नी व दोन्हीकडच्या कुटुंबांचे समुपदेशन समितीचे सदस्य विनामूल्य करतील. अशा प्रकरणात समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न समितीकडून करण्यात येणार आहे.

दाम्पत्याचा संसार नव्याने सुरू

समितीच्यावतीने असे दोन प्रकरणात समन्वय घडून आणलेला आहे. एका दाम्पत्याचा संसार नव्याने सुरू झाला, तर दुसऱ्या प्रकरणात लवकरच न्यायालयात समन्वय कारवाई पूर्ण होऊन त्या दाम्पत्याचा सुद्धा संसार नव्याने सुरू होणार आहे. समाजातील सर्वच लोकांनी या समन्वय समितीस मदत करावी, असे आवाहन अकोल्यातील मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांनी केले.