लोकसत्ता टीम गोंदिया : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय कसा निर्माण झाला त्यावर मला आता जायचं नाही , पण राज्यात आरक्षणाच्या प्रश्न हा अनेक दिवसांपासून चाललेला आहे प्रत्येकाला आरक्षण मिळावे, संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका तर आहेच, सरकारने पण हीच भूमिका घेऊन पुढं जावं पण सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत तर नाहीत ना असे प्रश्न आता लोकांपुढे आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली आहे . ते आज शुक्रवार २६ जुलै रोजी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आले असताना माध्यमांनी राज्यातील सद्याची परिस्थिती वर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. पुढे नाना पटोले म्हणाले की सरकार पुढे आम्ही आपली भूमिका स्पष्ट केली आहे की, आरक्षणा संदर्भात जनगणना हा त्या सगळ्यांचा मूळ गाभा आहे. जातीनिहाय जनगणना केल्या वरच आम्हाला कुणाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे विविध समाजातील आकडे जोपर्यंत केंद्र सरकार पर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटू शकणार नाही. पण अशा पद्धतीने ( हाके आणि प्रकाश आंबेडकर) ज्या ज्या कुणाला राजकारण करायचे असेल तो त्याच्या प्रश्न आहे पण काँग्रेसची भूमिका यात स्पष्ट आहे की जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या प्रश्नावर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी लढतो आहे. आणखी वाचा-गडचिरोली : धक्कादायक! आत्मसमर्पित नक्षल्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या आज माझ्या राज्याच्या जनतेसमोर जे मूळ प्रश्न आहेत ते आहे बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आत्महत्या आहेत, महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण आहे आणि आज आपण नैसर्गिक आपत्तीमुळे अडकलेले आहोत. दोन दिवसांपूर्वी नागपूर मध्ये नावेने फिरावे लागत होते, आज पुण्यात नावेने फिरावे लागत आहे. तिथं तर लोकांच्या जीवही गेलेला आहे. मदती करिता सेनेला पाचारण करण्यात आलं आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे काही भागात अद्याप पाऊस पडलेला नाही तेथील शेतकरी यामुळे चिंतातूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्यांना मदत करायची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. आणखी वाचा-‘एमपीएससी’ दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणार! पुण्यात मुख्यमंत्र्यांनी लोकांना एयरलिफ्ट करण्याचे आदेश दिले आहेत पण विदर्भात अशी कुठली भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भूमिका विदर्भा संदर्भात दुटप्पी वाटते का? या प्रश्नाच्या उत्तरात नाना पटोले म्हणाले की सरकार हे विदर्भविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे, आपण आकडेवारी पाहिली तर २०१४ आणि या सरकारच्या कार्यकाळात विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आहेत बेरोजगारांच्या आत्महत्या विदर्भात जास्त आहेत सरकारला मी या संदर्भात अनेकदा समजावून सांगितलं की महाराष्ट्र म्हणून आम्ही विचार केला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये भेदभाव करता येत नाही. पण ठीक आहे शेवटी सरकार मायबाप आहे आणि पुढील काहीच दिवसात आम्ही सगळे जनतेच्या दरबारात मत मागायला जाणार आहोत, त्यामुळे जनता निर्णय करेल. पण मूळ प्रश्न आहे की शाहू, फुले,आंबेडकर यांच्या राज्यात असा भेदभाव होता कामा नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. असेही नाना पटोले म्हणाले.