अमरावती: एखाद्या भाषेतील वापरात असलेल्या तसेच वापरातून गेलेल्या सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्दकोश. शब्दांच्या अर्थासहित वाक्संप्रदाय, म्हणी यांचाही त्यांत अंतर्भाव होतो. शब्दांचा अर्थ समजावा आणि जिज्ञासूची शब्दशक्ती वाढावी, हा एक हेतू शब्दकोश रचनेमध्ये असतो. आतापर्यंत उपलब्ध असलेल्या मराठी शब्दकोशात साधारणपणे दीड लाख शब्दांचा संग्रह आहे. पण, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने १० अब्ज शब्दांचा मराठी शब्दकोश तयार करण्याचे शिवधनुष्य हाती घेतले आहे.
नेमके उद्दिष्ट काय?
राज्याच्या सर्वांगिण आणि दीर्घकालीन विकासासाठी १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विकसित महाराष्ट्र, २०४७ ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ तयार करण्यात आले आहे. या अंतर्गत १६ क्षेत्रीय गट निवडण्यात आले आहेत. यात सम्यक शक्ती हा एक गट आहे. या गटांतर्गत ६ विभाग असून मराठी भाषा विभाग हा त्यापैकी एक विभाग आहे. या ‘व्हिजन डॉक्यूमेंट’ अंतर्गत संस्कृती आणि ज्ञान यासाठी मराठी भाषेला आधुनिक आणि सर्वसमावेशक भाषा म्हणून सक्षम करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कृती आराखडा निश्चित करणार
मराठी भाषेचे डिजिटायजेशन करणे, हा या उपक्रमांचा एक भाग आहे. त्यात छापील पृष्ठांचे स्कॅनिंग, श्राव्य मजकुरांचे संग्रहण आणि मराठी नाटकांचे संहिताकरण करणे तसेच १० अब्ज शब्दांचा ‘एआय कॉर्पस’वर आधारित असलेला मराठी शब्दकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. याशिवाय दुर्मिळ मराठी हस्तलिखितांचे आणि प्राचीन दस्तऐवजांचे डिजिटाझेशन करणे आणि अनुवाद करणे हे उपक्रम राबविण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्यात येत आहे.
नियोजन आराखडा काय?
नियोजन आराखड्यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयांच्या तसेच या क्षेत्रातील शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या सहकार्याने सामूहिक सहभागातून आणि सहकार्यातून ‘एआय कॉर्पस’वर आधारित असलेला मराठी शब्दकोश तयार करण्यात येईल. या कामांचे संपूर्ण नियोजन आणि समन्वय मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने भाषा संचालनालायामार्फत करण्यात येणार आहे.
मराठी शब्दकोशाची पंरपरा
मराठीमध्ये बाराव्या शतकापासून कोशरचनेचे प्रयत्न झालेले दिसतात. हेमाद्री यांनी कठीण संस्कृत शब्दांना मराठी शब्द देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. तो द्विभाषिक शब्दकोशाचा प्रारंभ होता. सोळाव्या शतकानंतर ज्ञानेश्वरीचे परिभाषा कोश तसेच पर्याय कोश तयार होऊ लागले.
