scorecardresearch

मराठी नाटय़ परिषदेत ‘सभासद नाटय़’!, निवडणूक जिंकण्यासाठी खोटे अर्ज भरल्याची तक्रार

नाटय़ परिषदेची निवडणूक जाहीर होताच परिषदेतील राजकारणाने पुन्हा तोंड वर काढले आहे.

nl akhil sahitya sammelan
(संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता)

शफी पठाण

नागपूर : नाटय़ परिषदेची निवडणूक जाहीर होताच परिषदेतील राजकारणाने पुन्हा तोंड वर काढले आहे. परिषदेच्या एका गटाने निवडणूक जिंकण्यासाठी भरमसाट बनावट सभासद तयार केले असून, त्यातील अनेकांना नाटय़ परिषदेचे सभासद असल्याची कल्पनाच नाही. त्यामुळे निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी मुंबईच्या धर्मादाय आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. निवडणूक जिंकण्याचा उद्देश डोळय़ासमोर ठेवून ३० मे २०१९ ते १८ नोव्हेंबर २०२० या काळात बेकायदा पद्धतीने ३३६ नवीन सभासद कसे नोंदवण्यात आले, याची जंत्रीच नाटय़ परिषदेचे सदस्य अ‍ॅड. गौरव खोंड यांनी परिषदेच्या प्रस्तावित निवडणुकीचे काम पाहणाऱ्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.

हे नवीन सभासद बेकायदा कसे आहेत, हे सांगताना खोंड यांनी नागपूर शाखेने नियमावली डावलून केलेला आर्थिक घोळही समोर आणला आहे. त्यानुसार, नवीन सभासद वर्गणी ही प्रथम शाखेच्या बँक खात्यात भरून त्यातील ५० टक्के रक्कम म्हणजेच प्रती सभासद ५५० रुपये ही मध्यवर्ती शाखेकडे नोंदणी अर्जाबरोबर पाठवावी लागते. परंतु, शाखेने नियमाचे उल्लंघन करून ३० मे २०१९ रोजी नोंदणी शुल्क म्हणून १ लाख १० हजार रुपयांचा रोख भरणा केला. तसेच ज्यांची नावे सभासद म्हणून देण्यात आली त्यांच्यापैकी अनेकांना नाटय़ परिषद काय आहे, हेही माहित नाही. त्यांच्या नावासमोर केलेली स्वाक्षरीही त्यांची नाही. एका सभासदाने तर मी कुठलाही अर्ज भरलेला नसताना माझे नाव सभासद यादीत आल्याचे शपथपत्रच दिले आहे. सूचक व अनुमोदकाच्या रकान्यातही खोटय़ा स्वाक्षऱ्या असल्याचा दावा अ‍ॅड. खोंड यांनी त्यांच्या पत्रात केला आहे.

एकाच गावातील सभासद संख्याही संशयास्पद

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बोरचांदली या केवळ अडीच हजार लोकसंख्या असलेल्या छोटय़ाशा गावातील तब्बल २० वर नागरिकांनी परिषदेचे सभासदत्व स्वीकारले आहे. ही संख्या संशयास्पद आहे. महाराष्ट्राच्या एका टोकावरील इतक्या छोटय़ा गावात अचानक नागरिकांचे नाटय़प्रेम कसे उफाळून आले असेल, या प्रश्नावरही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

हे सर्व सभासद तीन वर्षांपूर्वी झाले आहेत. ते बनावट नाहीत. मध्यवर्ती शाखेने जी यादी दिली त्यातही ही सर्व नावे आहेत. सर्वानी स्वेच्छेने अर्जावर स्वाक्षरी केली आहे. एका सभासदाला भ्रमित करून त्याच्याकडून खोटे शपथपत्र लिहून घेतले. हे सर्व निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक खेळले जाणारे राजकारण आहे. हे राजकारण करणाऱ्यांनी खोटय़ा सभासदाच्या मुद्यावर समोरासमोर बसून युक्तिवाद करावा, असे माझे आव्हान आहे.

– नरेश गडेकर, अध्यक्ष, अ. भा. मराठी नाटय़ परिषद

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 00:02 IST