नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३१ मार्च अखेरपर्यंत ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान मिळणे गरजेचे होते. मात्र, जिल्ह्यात केवळ ५० टक्के शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळाली असून उर्वरित ३२ हजार शेतकरी ३१ मार्च जवळ येऊनही प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष घालून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळवून देण्याची मागणी महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: निवडणूक विभागात कार्यरत शिपायाची आत्महत्या; कारण अस्पष्ट
राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रूपयांची रक्कम खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी राज्यात सत्तांतर होण्यापूर्वी प्रोत्साहनपर रक्कम अशा शेतकऱ्यांचे खात्यात जमा होण्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण देखील झाली होती. पुढे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले या सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे खात्यात रक्कम जमा करून दिवाळी गोड करू अशा वल्गना केल्या. मात्र, सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची याद्या वारंवार पाठवून व सहकार विभागाकडून तब्बल ३ वेळा अंकेक्षण करूनही हजारो शेतकऱ्यांची नावे आजवर यादीत आले नाहीत. तीन याद्या प्रसिध्द झाल्या असल्या तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ३२ हजाराच्या वर शेतकरी अनुदानापासून वंचित आहे. शिंदे सरकारने ३१ मार्च पूर्वी सर्वांचे खात्यात प्राेत्साहनपर रक्कम जमा करू अशी घोषणा केली होती. मात्र, मार्च एंडींग एका आठवड्यावर येऊन ठेपला असतांनाही उर्वरीत शेतकऱ्यांची यादी लागलेली नसल्याने लाभ मिळणार कि, नाही अशी शंका शेतकऱ्यांमध्ये आहे. शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज परतफेड करण्यासाठी ३१ मार्च हि अंतीम तारीख असल्याने कर्जाचा भरणा केल्यास व्याज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रोत्साहन अनुदान मिळाल्यास पीक कर्ज फेडण्यास मदत होईल अशी अपेक्षा शेतकरी बांधव बाळगून आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा करून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे प्रोत्साहन रक्कमेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र् प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.