यवतमाळ: दरवर्षी मार्च महिना उजाडला की, शासकीय कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. आर्थिक वर्षाचा शेवट, कामाचा वाढता डोंगर आणि वसुलीचा तगादा यामुळे मार्च महिना म्हणजे ‘घाम फोडणारा महिना’ अशीच याची ओळख. मात्र, उद्यापासून सुरू होणारा मार्च महिना याला अपवाद ठरणार आहे. या महिन्यात तब्बल १३ सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांची दिवाळीच आहे.

पंचांगातील ग्रहांची स्थिती आणि अधिक मासामुळे बदललेले सणांचे समीकरण यामुळे यंदाचा मार्च एण्ड कर्मचाऱ्यांसाठी ‘टेन्शन’ देणारा नसून ‘व्हॅकेशन’ साजरा करण्यासाठी योग्य काळ ठरणार आहे. यावर्षीच्या कालगणनेनुसार मे महिन्यात ‘अधिक मास’ येत असल्याने, शके संवत्सरातील अनेक मराठी सण सुमारे १५ ते २० दिवस आधी आले आहेत.

सामान्यतः एप्रिल महिन्यात साजरे होणारे महत्त्वाचे सण यंदा मार्चमध्येच आल्याने सुट्ट्यांचा आकडा फुगला आहे. भारतीय पंचांग आणि अधिकृत सुट्ट्यांच्या अधिसूचनेनुसार, या महिन्यात धूलिवंदन ते महावीर जयंतीपर्यंत सणांची मोठी साखळी पाहायला मिळत आहे. ५ रविवार आणि सणवारांची जोड या महिन्यात बघायला मिळत आहे.

३१ दिवसांच्या या महिन्यात केवळ कामकाजाचे दिवस कमी असून सुट्ट्यांची संख्या विक्रमी आहे. या महिन्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात आलेल्या पाच रविवारच्या भक्कम पाठिंब्यासोबतच सणांच्या पाच जाहीर सुट्ट्यांची भर पडली आहे. यात ३ मार्च धूलिवंदन, १९ मार्च गुढीपाडवा, २१ मार्च रमजान ईद, २६ मार्च श्रीरामनवमी आणि ३१ मार्च महावीर जयंती या शासकीय सुट्ट्या कर्मचाऱ्यांसाठी ‘जॅकपॉट’ ठरल्या आहेत.

ज्या शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा लागू आहे, त्यांच्यासाठी तर ही सुवर्णसंधीच आहे. महिन्यातील चार शनिवार या सुट्ट्यांमध्ये भर घालणार आहेत. परिणामी, एकूण सुट्ट्यांचा आकडा १३ वर पोहोचत आहे. सलग येणाऱ्या सुट्ट्यांमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्तापासूनच कुटुंबासह सहलीचे बेत आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः १९ मार्च (गुढीपाडवा) आणि २१ मार्च (ईद) यांच्या दरम्यान केवळ २० तारखेची रजा घेतल्यास सलग चार दिवसांची सुट्टी मिळवणे सहज शक्य होणार आहे. तसेच २७ आणि ३० मार्च अशा दोन रजा घेतल्या तर सहा दिवस सलग सुट्टी मिळणार आहे.

मार्च महिना हा परीक्षेचा काळ असला, तरी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या सुट्ट्यांमुळे अभ्यासाच्या तणावातून मोठा विरंगुळा मिळणार आहे. सणासुदीच्या निमित्ताने मिळणाऱ्या या सुट्ट्या मुलांसाठी उत्साहाची पर्वणीच ठरणार आहेत. दरवर्षी मार्च एण्डला कामाच्या ओझ्याखाली दबलेला कर्मचारी यंदा मात्र प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. एकीकडे आर्थिक वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याचे आव्हान असले, तरी दुसरीकडे निसर्गाची साथ आणि सणांची जोड यामुळे २०२६ चा मार्च महिना खऱ्या अर्थाने ‘सुखदायी मार्च’ ठरणार आहे.