नागपूर : गेल्या दीड वर्षांत करोना महासाथीमुळे विवाह निश्चित होऊनही बंधनात अडकू न शकणाऱ्या विदेशातील नागपूरकर तरुणांनी यंदा लग्नाचा मुहूर्त ठरवला. त्यांच्या कुटुंबीयांनी सारी तयारीही केली. पण ऐन वेळी ओमायक्रॉनच्या नव्या उग्र रूपातील करोना दाखल झाल्याने त्यांचा विवाह आणखी काही दिवसांसाठी लांबण्याची चिन्हे आहेत.

करोनाच्या साथीमुळे मूळचे वैदर्भीय पण नोकरीनिमित्त विदेशात राहणारे तरुण भारतात परत येऊ शकले नव्हते. यापैकी काहींचे विवाह ठरले होते, पण मायदेशी परतण्याच्या अडचणींमुळे कुटुंबांनी गेल्या वर्षीचे विवाह समारंभ पुढे ढकलले होते. दरम्यान, यंदा काही महिन्यांपासून करोनाची साथ कमी झाली, निर्बंधही शिथिल झाले. आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू झाल्यामुळे कुटुंबीयांनी विवाहासाठी नव्या तारखा निश्चित केल्या. पण ऐन वेळी ओमायक्रॉनने पुन्हा अडचणी निर्माण केल्या.

महालमधील इलमुलवार, नंदनवन भागातील सवाने यांच्यासह शहरातील इतरही भागांत राहणाऱ्या पाच ते सहा कुटुंबीयांमधील लग्नव्यथा सारखीच आहे. इलमुलवार कुटुंबातील मुलगा रोहन दक्षिण अफ्रिकेतील एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. त्याचा विवाह विदर्भातील एका युवतीसोबत ३० डिसेंबरला नागपुरात होणार होता. त्यासाठी रोहन १० डिसेंबरला नागपूरला येणार होता. दोन्ही कुटुंबीयांनी विवाह समारंभाची संपूर्ण तयारी केली. विवाहस्थळ, स्वागत समारंभासाठी हॉटेल, पाहुण्यांच्या राहण्याची तयारी सर्व झाली होती. विवाहानंतर नवदाम्पत्य जानेवारीत दक्षिण आफ्रिकेत परतणार होते. मात्र ओमायक्रॉनमुळे सर्व तयारी फुकट गेली. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली. त्यामुळे उपवर मुलाचे भारतात येणेच अनिश्चित आहे. त्यामुळे इलमुलवार कुटुंबीयांनी विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नंदनवन परिसरातील सवाने कुटुंबातील मुलगा जर्मनीमध्ये राहातो. याचाही विवाह दुसऱ्यांदा पुढे ढकलावा लागला. पूर्वी तो मार्च महिन्यात नियोजित होता. तेव्हा टाळेबंदीमुळे होऊ शकला नाही. आता डिसेंबरमध्ये त्याचा विवाह होता. तो १५ डिसेंबरला नागपूरला पोहोचणार होता. मात्र जर्मनीतून येथे येण्यासाठी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा विवाहाचा बेत रद्द करण्यात आला. 

झाले काय? 

ओमायक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेसह काही विदेशातून येणाऱ्या विमानसेवा बंद करण्यात आल्या तर काही ठिकाणी निर्बंध लागल्याने अनेक तरुण विदेशातच अडकले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दुसऱ्यांदा मुलाचा विवाह समारंभ रद्द करावा लागला. नागपुरात पाच ते सहा कुटुंबाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

मार्च महिन्यात मुलाचा विवाह ठरवला होता. त्या वेळी सर्वत्र टाळेबंदी होती. त्यामुळे मुलगा येऊ शकला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये विवाह ठरवला होता आणि तो १५ डिसेंबरला येणार होता. मात्र दक्षिण आफ्रिकेतून विमानसेवा बंद करण्यात आल्यामुळे त्याला नागपुरात पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यालयासह विवाहाची सर्व व्यवस्था करण्यात आली असताना ते रद्द करण्यात आले आहे.

मारोतराव सवाने, नंदनवन.