अमरावती : एका विवाहितेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिच्या जवळील दागिने व रोखही हिसकाविण्यात आली. ही धक्कादायक घटना येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेख आसीम शेख कलीम (२८) रा. येवदा व मोबिन पठाण (३५) रा. खोलापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित २१ वर्षीय विवाहिता ही ४ मे रोजी आपल्या मुलीसह भावाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमाकरिता येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आली होती. त्यावेळी तिच्यासोबत पतीने दिलेले १ लाख ५० हजार रुपये रोख, सोन्याची पोत, एक छोटे मंगळसूत्र, नथ, सोन्याचे कानातले, मुलीचे हातातील सोन्याचे कडे, लॉकेट, अंगठी व चांदीचे कडे असे सोन्या-चांदीचे दागिनेदेखील होते. दरम्यान, तेथे तिची आरोपी शेख आसीम याच्याशी भेट झाली. त्यांच्यात मोबाइलवर संवादसुद्धा झाला. त्यावेळी शेख आसीमने तिला प्रेमजाळ्यात ओढले.

हेही वाचा…फडणवीस पालकमंत्री, तरीही नागपूरमध्ये नझूलच्या जागेवरील पट्टे वाटप रखडले

माझ्यासोबत चल, आपण लग्न करू, दुसऱ्या गावात जाऊन आपला संसार मांडू, असे त्याने तिला सांगितले. त्याचवेळी कुणाला काहीही सांगितले, तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पीडित विवाहिता ही ९ मे रोजी सकाळी शेख आसीम व मोबिन पठाण यांच्यासोबत घरून निघून गेली. त्यानंतर शेख आसीम याने पीडित विवाहितेवर जबरीने अत्याचार केला. १३ मे रोजीसुद्धा त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्याचवेळी कुणीतरी पीडित विवाहितेकडील सोन्याचे दागिने व रोख हिसकावून घेतली. शेख आसीम व मोबिन पठाण यांच्या तावडीतून सुटका झाल्यावर पीडित विवाहितेने येवदा ठाणे गाठून तक्रार दाखल केली.