नागपूर : विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली जात असताना राजुरा येथील राहणारे विदभर्वादी बाबाराव व शोभा मस्की या दाम्पत्याने आम्हाला ईश्वराने निपुत्रिक ठेवले पण विदर्भाची अडीच कोटी जनता हीच आमची मुले-बाळे आहेत. आम्हाला विदर्भाच्या जनतेची वेदना बघविली जात नाही. त्यामुळे संविधान चौकात स्वत:ला बेड्यामध्ये जखडून बंद पिंजऱ्यामध्ये कैद करुन मस्के दाम्पत्याने आमरण उपोषण सुरू केले. गेल्या चार दिवसांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवादी कार्यकर्त्याकडून अभिनव आंदोलन सुरू आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जय विदर्भ राज्य पार्टीच्यावतीने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलने केली जात आहेत. केंद्र व राज्य सरकार याबाबत काहीच बोलायला तयार नाही. उपोषण केले जात असताना उपोषणकर्त्याचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सरकारमधील कोणी येत नाही. आता बलिदान दिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळे आता विदर्भवादी नेत्यांनी स्वत:ला साखळी बेड्यामध्ये अडकवून पिंजऱ्यामध्ये आंदोलन सुरू केले. मस्की दाम्पत्याने या पूर्वी साखळी बेड्यामध्ये स्वत:ला अडकवून घेत सरकारचे लक्ष वेधले होते. यावेळी शोभा मस्की म्हणाल्या, मी एक माय आहे. माझ्या विदर्भातील शेतकऱ्याच्या आत्महत्या मी कशी पाहू शकते. युवकांचे विदर्भाच्या बाहेर पलायन होत आहे, विदर्भ फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या वास्तव्याचे ठिकाण झाले आहे. विदर्भाला सातत्याने लुटून पश्चिम महाराष्ट्राला संपन्न केले जात आहे. हे मी कसे पाहणार. जोपर्यंत विदर्भ राज्य मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार, माझा जीव गेला तरी चालेल, त्याकरता अंतिम श्वासापर्यंत लढा देणार आहे. विदर्भाच्या जनतेला सुखी, समाधानी, संपन्न करण्याच्या उद्देशाने हे राज्य मिळवून घेणार असा निर्धार मस्की दाम्पत्यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्त्यांनी केला.
हेही वाचा – सर्व विमानतळांवर ‘मंकीपॉक्स’ तपासणी, आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर
हेही वाचा – ना सेल्फी, ना फोटो, ना मोबाईल… तरीही पक्ष कार्यकर्त्यांना मिळणार प्रशिक्षण
मस्की दाम्पत्यासह उपोषण आंदोलनाला सहकार्य करत आंदोलन स्थळी हिंगना तालुका अध्यक्ष अभिजित बोबडे यांनी केंद्र सरकारद्वारे अन्न धान्य व कपड्यावर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात अर्धनग्न होऊन हातापायाला बेडीने जखडून स्वतःला दिवसभर पिंजऱ्यात कैद करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या आंदोलनात वेगवेगळे विदर्भवादी कार्यकर्ते उपोषण करत राज्य व केंद्र सरकाला धारेवर धरत निषेध करणार आहे. उपोषण स्थळी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार म्हणाले, स्वातंत्र्यदिनापासून विदर्भाच्या जनतेला उपोषण करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. विदर्भाचा अंतिम लढा सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही विदर्भातून हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही. लाठी खाऊ, गोळी खाऊ पण विदर्भ राज्य मिळवूनच घेऊ असा इशारा विदर्भवादी नेत्यांनी दिला.