वर्धा : तब्बल अठरा वर्षे केंद्रीय कृषिमंत्रीपद भूषविलेले अण्णासाहेब शिंदे यांचे हरित व धवल क्रांतीत मोठे योगदान राहल्याचा इतिहास आहे. आता त्यांची नात मयूरा काळे आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेण्यास सज्ज झाल्या आहेत.
आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांच्या अर्धांगिनी असलेल्या मयुराताई या अण्णासाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शिंदे यांच्या कन्या आहेत. शिंदे फाउंडेशनचे विश्वस्त असलेले ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेत पुण्यात झालेल्या बैठकीत आर्वीत काही प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच अनिल, अशोक व दिलीप शिंदे, डॉ. प्रसन्न बंब व अन्य सहभागी झाले होते.




हेही वाचा – भंडारा: तरुणाने वाढदिवसाला तलवारीने कापले तब्बल ११ केक, व्हीडिओ व्हायरल
मयुरा काळे यांनी बैठकीत आर्वी परिसरातील गौलावू गाई वंश संवर्धनाचा मुद्दा मांडला. या गाईच्या दुधात असलेले औषधी गुणधर्म पोषक असे आहेत. मोजक्या संख्येत असलेल्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. परिसरातील गोपालक स्री पुरुषांना सहभागी करून घेत गोमूत्र, शेण यापासून सेंद्रिय खत, अर्क, किट नाशके तयार करण्याचे लघु उद्योग तयार होवू शकतात. कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यात गोठीत वीर्य मात्रा व वळू संगोपन प्रकल्प उभे करण्याचे निश्चित झाले.
हेही वाचा – अमरावतीत बच्चू कडूंचा लोकसभेचा उमेदवार कोण? कोणाचे नाव चर्चेत, जाणून घ्या..
मयुरा काळे म्हणाल्या की, सध्या काही गावात कृषी गटाच्या माध्यमातून आमचे काम सुरू आहे. माननीय पवार काका आमच्या आजोबांच्या काळापासून कौटुंबिक स्नेह राखून असल्याने त्यांनी काही सूचना आवर्जून केल्या. शिंदे फाउंडेशन तांत्रिक व अन्य स्वरुपातील सहकार्य करतील. त्यामुळे या भागाचा निश्चित विकास होवू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.