नागपूर : व्यसनांच्या आहारी गेलेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचा नेम नसतो. क्षणभराची तलफ भागवण्यासाठी घरातल्या वस्तू देखील गहाण ठेवणारे व्यसनी व्यक्ती आपण अवती भोवती पहातच असतो. असाच काहीसा प्रकार शनिवारी पाचपावली पोलिसांनी उघडकीस आणला. एमडी (मेफेड्रोन)च्या व्यसनाने एका तरुणाचा सुखी संसार अक्षरशः उध्वस्त केल्याच्या प्रकारावरचा पोलिसांनी पडदा उघडला. व्यसनाची तलफ भागवण्यासाठी त्याने थेट दुचाकी चोरीचा मार्ग अवलंबत बॅटऱ्या काढून काळ्या बाजारात विक्री सुरू केली.

विनय उर्फ विक्की राजबहादूर शाहू (२७) रा. बीनाकी मंगळवारी, वंडरफूल शाळेसमोर असे एमडीच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन तरुणाचे नाव आहे. एमडी या अंमली पदार्थाच्या पुरत्या आहारी गेलेल्या विनयने केलेले कारनामा पाहून पोलीसही चकीत झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनय उर्फ विक्की राजबहादूर शाहू (२७) रा. बीनाकी असे या व्यसनाधीन वाहन चोराचे नाव आहे. विनय हा विवाहित असून त्याला दोन मुले देखील आहेत. मात्र एमडीच्या आहारी गेल्याने त्याचे कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. आधी स्वतःची दुचाकी गहाण ठेवून मिळालेले पैसे त्याने व्यसनात उडवले. पैसे कमी पडू लागल्यावर त्याने परिसरातून एकामागोमाग सात दुचाकी चोरल्या. त्या दुचाक्यांमधील बॅटऱ्या काढून विकून तो नशेची गरज भागवत होता.

आधी विनयनने एमडीच्या नशेत स्वतःची दुचाकी गहाण ठेवली. यातून आलेल्या पैसे व्यसनांवर उधळले. नंतर पैसे कमी पडू लागल्याने त्याने परिसरातील दुचाकी चोरीचा सपाटा सुरू केला. एकेक करत त्याने परिसरातील ७ दुचाकी चोरल्या. चोरलेल्या मोपेडमधून बॅटरी काढून घेतल्यानंतर विनय त्याची काळ्या बाजारात विक्री करू लागला. यातून आलेल्या पैशांची व्यसनांवर उधळपट्टी सुरू केली.

असा झाला उलगडा

इंदोरा येथील रहिवासी सुरज मेश्राम हे पत्नी श्वेता यांच्या सोबत १ जानेवारीला इंदोरा येथील गुरुनानक लॉनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते बाहेर आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांची ही दुचाकी विनयने चोरी केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. या गुन्ह्याच्या तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक रणजीत माजगावकर यांना एक अजब प्रकारावर संशय आला.

परिसरातून चोरीला जात असलेल्या सुझुकी आणि एक्टिव्हा सारख्या मोपेडमधून केवळ बॅटरी चोरीला जात असल्याचे आढळले. त्या दिशेने तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमधून एकाच प्रकारचा व्यक्ती विशिष्ट पद्धतीने चोरी करत असल्याचे आढळले. काही ठिकाणी दुचाकी सुरक्षित पण बॅटऱ्या गायब असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एकाच व्यक्तीची संशयास्पद हालचाल दिसली. पोलिसांनी सापळा रचून विनयला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.