scorecardresearch

यांत्रिक कर्मचाऱ्यांचा चालक, वाहतूक नियंत्रकांचा वाहक म्हणून वापर !

एसटी कामगारांनी शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेला संप मिटण्याची चिन्हे नाहीत.

‘एसटी’च्या बसफेऱ्या वाढवण्याची नवीन क्लृप्ती

महेश बोकडे

नागपूर : एसटी कामगारांनी शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेला संप मिटण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना एसटी बसेसवर चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रकांचा वाहक म्हणून वापर करून बसफेऱ्या वाढवण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांना झटपट उजळणी प्रशिक्षणही दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयानुसार संप कालावधीमध्ये पहिल्या टप्प्यात चालक पदातून ज्यांना वाहक परीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षक पदावर पदोन्नती दिली गेली त्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे उजळणी प्रशिक्षण देऊन त्यांचा प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. त्यासाठी संबंधिताकडे प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना (बिल्ला) आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्या यांत्रिक कर्मचाऱ्याकडे अवजड वाहन चलवण्याचा परवाना आहे, त्यांची माहिती विभागीय पातळीवर संकलित केली जाईल. 

या कर्मचाऱ्यांचा ऑनलाईन अर्ज करून प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रवासी वाहन चालक परवाना व बिल्ला काढायचा आहे. या कर्मचाऱ्यांना सात दिवसांचे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. पैकी ज्या कर्मचाऱ्यांचा प्रशिक्षणानंतर अहवाल विभागीय वाहतूक अधिकारी व वाहतूक निरीक्षक (चालक प्रशिक्षण) यांनी समाधानकारक दिला, त्यांचा वापरही प्रवासी बसचालक म्हणून केला जाईल. ज्या यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना आहे. त्यांचा वापर संपकाळात खाते वाहन व मार्ग तपासणी वाहनांसाठी केला जाईल. तर खाते वाहन व मार्ग तपासणी वाहनांवर नेमणूक केलेल्या चालकांच्या प्रवासी वाहनांवर चालक म्हणून वापर केला जाईल. वाहतूक नियंत्रक म्हणून ज्या वाहकांना पदोन्नती दिली आहे, त्यांचा संपकाळात वाहक म्हणून वापर केला जाणार आहे.

प्रतीदिन ३०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता

यांत्रिक अथवा वाहतूक कर्मचाऱ्यांचा वापर संप काळात चालक म्हणून आणि वाहतूक नियंत्रक यांचा वापर संप काळात वाहक म्हणून केल्यास अशा कर्मचाऱ्यांना प्रती दिन ३०० रुपये इतका प्रोत्साहन भत्ता देण्याचीही तरतूद करण्याची सूचना महामंडळाने सर्व विभाग नियंत्रकांना करण्याचेही सदर आदेशात नमूद आहे.

नागपूर विभागात महामंडळाच्या नवीन निर्णयामुळे संपकाळासाठी सुमारे ४० चालक आणि ५० च्या जवळपास वाहक उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळे निश्चितच बसेससह फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांना दिलासा मिळेल.

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, नागपूर.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mechanical personnel drivers transport controllers carriers ysh

ताज्या बातम्या