दारूमुळे हिंसा वाढली, राज्यात आत्महत्या नव्हे, त्या हत्याच | Loksatta

दारूमुळे हिंसा वाढली, राज्यात आत्महत्या नव्हे, त्या हत्याच

१०० दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्या तरी त्यापैकी केवळ १० बाटल्यांचाच कर सरकार जमा होतो.

दारूमुळे हिंसा वाढली, राज्यात आत्महत्या नव्हे, त्या हत्याच
सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर

नर्मदा बचाव आंदोलनाच्या संयोजक मेधा पाटकर यांची टीका

दारूमुळे हिंसेत वाढ होत असून महाराष्ट्रात आत्महत्यांचे सत्र म्हटले जात असले तरी मुळात त्या हत्याच असल्याची टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी केली असून बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही कडक कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.

देशभरात नशामुक्त भारत आंदोलनाची सुरुवात १ जुलैला दिल्ली येथून करण्यात आली असून नागपुरात दाखल झालेल्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांची परिषद आज विनोबा विचार केंद्रात झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर यांनी देशभरात दारू आणि इतर व्यसनांमुळे तरुणाई बेचिराख  होत असल्याची माहिती दिली. वेगवेगळ्या राज्यातील २० सामाजिक संघटना या आंदोलनात उतरल्या असून त्या त्या राज्यातील व्यसनांची माहिती त्यांनी दिली. देशभरातील आत्महत्या, दुर्घटनांचे कारण केवळ दारू असून महाराष्ट्रात दर महिन्याला १,४४० तर देशभरात १० लाखांच्यावर नागरिक केवळ दारूमुळे मृत्युमुखी पडतात. उद्या, रविवारी आंदोलक यवतमाळकडे कूच करणार आहेत. मेधा पाटकर यांनी राज्याच्या तीन जिल्ह्य़ांत दारूबंदी असतानाही अंमलबजावणी होत नसल्याकडे लक्ष वेधून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबरोबरच दारू उपलब्ध करून शासन हत्या घडवत असल्याचे त्या म्हणाल्या.

दारूमुळे महसूल मिळतो, असे एकीकडे सांगितले जात असले तरी एकूण १०० दारूच्या बाटल्या विकल्या जात असल्या तरी त्यापैकी केवळ १० बाटल्यांचाच कर सरकार जमा होतो. बाकी पैसा पक्षाच्या निधीत जमा होतो, असा आरोप बैतुल येथील डॉ. लोहिया समता आदिवासी केंद्राचे राष्ट्रीय संयोजक डॉ. सुनीलम् यांनी केली आहे. भूपेंद्र रावत यांनी पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये दारूबंदीवरही बोलावे, असे आवाहन केले. राघवेंद्र, आनंदी अम्मा, विलास भोंगाडे, रजनीकांत, दीपक चौबे, माया चवरे आणि लीलाताई चितळे आदी सामाजिक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-10-2016 at 05:03 IST
Next Story
प्राध्यापकाकडून विनयभंग