|| मंगेश राऊत
पाच ‘डमी’ परीक्षार्थी; शिकवणी वर्गांच्या संचालकांसह ५ जणांना अटक, नागपुरात सीबीआयचे छापे
नागपूर : देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘नीट’ परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण करण्याचा दावा करून मूळ विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थी बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील शिकवणी वर्गांद्वारे हा गैरप्रकार झाला असून, याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाच जणांना अटक केली आहे. सीबीआयने मंगळवारी संबंधित शिकवणी वर्गांवर छापे घातले.

सक्करदरा परिसरातील आर. के. एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर गाईडन्स आणि कॅरिअर पॉइंट असे या शिकवणी वर्गांचे नाव आहे. या शिकवणी वर्गांचे संचालक परिमल कोतपल्लीवार आणि अंकित यांच्यासह पाच जणांना दिल्ली सीबीआयने अटक केली.

बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला

प्रवेश घेण्यासाठी ‘नीट’ परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या शिकवणी वर्गांच्या संचालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना देशातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. काही विद्यार्थ्यांनी त्यासाठी संपर्क केला. आरोपींनी एका विद्याथ्र्याला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी ५० लाख रुपये घेतले. विद्यार्थी व त्याच्या पालकांनी आरोपींना ५० लाखांची हमी म्हणून आगाऊ धनादेश दिले. त्यानंतर आरोपींनी मूळ विद्यार्थ्यांच्या नावाने परीक्षेत बनावट विद्यार्थी बसवले. देशात १२ सप्टेंबरला नीट परीक्षा झाली. नागपुरातील पाच विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. याची माहिती दिल्ली सीबीआयला मिळाली. सीबीआयने शहानिशा करून गुन्हा दाखल करून परिमल, अंकित यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यानंतर नागपूर सीबीआय कार्यालयाच्या मदतीने मंगळवारी दोन्ही कार्यालयांत छापा घालून तेथील दस्तावेज जप्त केले.

बनावट कागदपत्रे

मूळ विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट विद्यार्थ्यांना ‘नीट’ परीक्षा देता यावी, यासाठी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व निवासाचा पत्ता बदलण्यात आला. त्यांची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. दिल्लीतील परीक्षा केंद्र मिळवून त्या ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि पकडले गेले.

मूळ गुणपत्रिका, दस्तावेज आरोपींकडे

इच्छित परीक्षा केंद्र आणि नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतर आरोपी हे त्यांना मिळालेले धनादेश वटवणार होते. धनादेश वटेपर्यंत हमी म्हणून विद्यार्थ्यांची दहावी व बारावीची गुणपत्रिका आणि इतर मूळ दस्तावेज त्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतले होते, अशी माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली. हे सर्व दस्तावेज, संगणक आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सीबीआयने जप्त केली आहेत.