वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची जिल्हा प्रशासनाला सूचना

नागपूर : मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांत गंभीर करोनाग्रस्तांवर उपचाराचा भार वाढला आहे. दोन्ही रुग्णालयांत जीवनरक्षण प्रणालीची संख्या (व्हेंटिलेटर) वाढवण्याच्या सूचना अधिष्ठात्यांना केली आहे. सोबत अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचाराची गरज असते. परंतु दोन्ही रुग्णालयांवर भार  वाढल्याने बरेच रुग्ण आकस्मिक विभागात प्रतीक्षेत असतात. तातडीने या रुग्णांवर उपचार व्हावा, म्हणून अधिष्ठात्यांना व जिल्हा प्रशासनाला येथील रुग्ण इतरत्र हलवण्याची सूचना केली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.

करोनाबाबत मेडिकल, मेयो रुग्णालयाच्या आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.  देशमुख म्हणाले, मेडिकल- मेयोत जीवनरक्षण प्रणालीची संख्या वाढली असली तरी रुग्णांच्या तुलनेत ती कमीच आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी ही संख्या वाढवायला सांगितले आहे. सोबतच अधिष्ठात्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला येथील दाखल्याच्या प्रतीक्षेतील रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यास सांगितले आहे. त्याबाबत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीही चर्चा करेल. निवासी डॉक्टरांच्या विलगीकरणाचा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची हॉटेल वा इतरत्र सोय करण्यास सांगण्यात येईल.

राज्याला मागणीच्या तुलनेत रेमडेसिविर कमी संख्येने उपलब्ध होत होते. त्यामुळे ते विविध जिल्ह्य़ांना कमी संख्येने उपलब्ध होत होते, आता जिल्ह्य़ाधिकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या वाटपाच्या सूचना केल्या आहेत. या वाटपात पारदर्शकता राहावी म्हणून  सूचना केली जाईल. कोणत्याही रुग्णालयांत औषधांसह इतर सुविधांची कमी पडू दिली जाणार नाही. केंद्राकडून महाराष्ट्राला फार कमी करोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच  मेडिकलसह राज्यातील अनेक केंद्रांवर वारंवार लसीकरण बंद पडते. तातडीने लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्राला पुरवठा वाढवण्यासह राज्याकडून लसींच्या खरेदीसाठीही पावले उचलली जात आहे. हाफकीनमध्ये लस निर्मितीला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. प्रत्यक्षात येथून  लस निर्मितीला किमान वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यासाठीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: लक्ष घालत असल्याचेही अमित देशमुख म्हणाले.

सीटी स्कॅन, एमआरआयसाठीही प्रयत्न

मेडिकलमध्ये एमआरआय यंत्र कालबाह्य़ झाले असून रुग्णांना बाहेरच्या तपासणी केंद्राचा रस्ता दाखवला जातो. या यंत्र खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचे प्रयत्न केले जातील. सीटी स्कॅनसह इतरही महत्त्वाच्या यंत्राच्या खरेदीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले.