सर्वसामान्य रुग्णांची रक्त मिळवण्यासाठी फरफट

नागपूर : दहा हजारात एखाद्या व्यक्तीचा रक्तगट  बॉम्बे असतो. असे असतानाही शहरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांत असा रुग्ण आढळल्यास रक्त मिळवण्यासाठी आवश्यक या गटाच्या दात्याच्या नोंदीची येथील रक्तपेढीत सोयच नाही. त्यामुळे कुणाला या गटाचे रक्त लागल्यास नातेवाईकांची फरफट होते. मेडिकलमध्ये दाखल एका रुग्णासोबत असे घडल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. परंतु सेवा फाऊंडेशनसह इतरांच्या अथक प्रयत्नाने  रुग्णाला दिलासा मिळाला.

अंजनाबाई गोहाने असे मेडिकलमध्ये दाखल महिलेचे नाव आहे. तिला तातडीने रक्ताची गरज होती.  तिचे रक्त बॉम्बे गटाचे असल्याचे स्पष्ट झाले. या गटाच्या रुग्णाला तेच रक्त लागते. मेडिकल- मेयोत हा रक्तगट नसल्याने मेडिकलच्या रक्तपेढीतील अधिकारी, सेवा फाऊंडेशन, सामाजिक अधीक्षकांसह नातेवाईकांनी नागपुरातील सर्व रक्तपेढीत चाचपणी केली असता कुठेच ते मिळाले नाही. दरम्यान, या गटाच्या रक्तदात्याचा शोध सुरू करण्यात आला. अमरावतीमध्ये भगतसिंग मडावी हा या रक्तगटाचा असल्याची माहिती मुंबईच्या थिंक फाऊंडेशनकडून कळली. त्यानंतर या व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला.

हा रक्तदाता अमरावतीतील एका खासगी कार्यक्रमात होता. त्यानंतरही त्याने वेळ न घालवता जवळच्या रक्तपेढीत रक्तदान केले. तातडीने हे रक्त नागपुरातील  रुग्णाला दिले गेले. यापूर्वीही मेयो रुग्णालयात गंगा पाचे नावाच्या रुग्णात ए २ बी निगेटिव्ह हा दुर्मिळ रक्तगट आढळला होता. या गटाचा रक्तदाता शोधण्यासाठी विविध यंत्रणा व नातेवाईकांची तारांबळ उडाली होती. शेवटी बंगळुरूवरून विमानाने हे रक्त नागपुरात बोलावण्यात आले. नागपूरसह विदर्भातही योग्य निरीक्षणातून या रुग्णांच्या नोंदी शक्य आहेत. त्यातच मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी, डागासह इतर शासकीय रुग्णालयांत वर्षांला २५ हजारांवर रक्तपिशव्या  संकलिन होतात. त्यासाठी मोठय़ा संख्येने रक्तदाते येतात. यातील बॉम्बेसह इतर रक्तगटाच्या दात्याची नोंद शासकीय रक्तपेढीने ठेवल्यास अनेकांचा मनस्ताप थांबणे शक्य आहे.

उपराजधानीला मेडिकल हब संबोधले जाते. परंतु येथे दुर्मिळ  रक्तगटाच्या रुग्णांची साधी नोंदही शासकीय यंत्रणेकडे नसणे लाजिरवाणे आहे. मेडिकल, मेयो या मोठय़ा शासकीय रक्तपेढय़ा आहेत. येथे वर्षांला हजारो दात्यांकडून रक्त उपलब्ध केले जाते. येथे दुर्मिळ गटातील दात्यांची नोंद ठेवल्यास अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतील.’’

राज खंडारे, सेवा फाऊंडेशन, विदर्भ.