रुग्णांचा जीव टांगणीला; वैद्यकीय शिक्षकांच्या बहिष्काराचा फटका
नागपूर : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेने सोमवारपासून अत्यवस्थ रुग्णसेवा वगळता इतर वैद्यकीय सेवांवर बहिष्कार टाकल्याने मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालिटी या तिन्ही रुग्णालयांतील नियोजित शस्त्रक्रिया ठप्प पडल्या. तर, बाह्यरुग्ण विभागासह सामान्य वॉर्डात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला. रुग्णालय प्रशासनाने मात्र रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली गेली, असा दावा केला.
उपराजधानीतील मेडिकल रुग्णालयात २६५, मेयोत १७०, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ३५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर संस्थेत काही संख्येत वैद्यकीय शिक्षक रुग्णसेवा देतात. या वरिष्ठ डॉक्टरांकडून अस्थायी डॉक्टरांना स्थायी करा, विविध भत्ते वाढवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खासगीकरण थांबवा, यासह इतर काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत या डॉक्टरांनी सोमवारपासून अत्यवस्थ रुग्णांची सेवा वगळता इतर वैद्यकीय सेवा बंद केल्या.
या आंदोलनामुळे तिन्ही रुग्णालयांमधील अत्यवस्थ रुग्णांच्या आपत्कालीन शस्त्रक्रिया वगळता बहुतांश नियोजित शस्त्रक्रिया स्थगित कराव्या लागल्या. त्यात मेडिकलमध्ये सुमारे ७०, मेयोत सुमारे ३०, सुपरस्पेशालिटीत २५ नियोजित शस्त्रक्रिया स्थगित झाल्या. तर या तिन्ही रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात एकही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वत्र निवासी आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांवरच रुग्णसेवेचा डोलारा होता. येथील सामान्य वॉर्डाचीही जबाबदारी या डॉक्टरांवरच होती. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करीत, शासन आणि वैद्यकीय शिक्षकांच्या वादात रुग्णांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगितले.
त्यातच दुपारी साडेबारा वाजता मेडिकल आणि मेयोच्या अधिष्ठाता कार्यालयात या डॉक्टरांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत निदर्शने केली. मेयो रुग्णालयात डॉक्टरांकडून धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपचाराला आलेल्या रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आवश्यक काळजी घेतली गेली. यामुळे कुणीही तक्रार केली नाही, असा दावा तिन्ही रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
दाखला नाकारला !
विविध रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी आजची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. परंतु डॉक्टरांच्या आंदोलनाचा दाखला देत शस्त्रक्रिया शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही, तर अनेक रुग्णांना दाखल करून घेण्यासही नकार देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. परंतु रुग्णालय प्रशासनाने गरज असलेल्या प्रत्येक रुग्णाला दाखल करून घेतल्याचा दावा केला.
अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षकच सेवेत
मेडिकल, मेयो रुग्णालयात अधिष्ठाता तर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात विशेष कार्य अधिकारी हे तीनच अधिकारी सोमवारी दिवसभर कामावर दिसले. परंतु अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षक काही वेळेसाठीच कार्यालयात येत होते, असा दावा आंदोलकांनी केला आहे.