scorecardresearch

अमेरिका, कोरिया, मॅक्सिकोच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त

अमेरिका, कोरिया, मॅक्सिको, सिंगापूर, इंग्लंडच्या तुलनेत भारतात विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार स्वस्त आणि दर्जेदार आहेत. त्यामुळे देशात वैद्यकीय पर्यटनाला खूप मोठी संधी आहे.

अमेरिका, कोरिया, मॅक्सिकोच्या तुलनेत भारतात वैद्यकीय उपचार स्वस्त
(डॉ. श्रीकांत ढाले)

निती आयोगाच्या अहवालाचा आधारे माहिती

महेश बोकडे

नागपूर : अमेरिका, कोरिया, मॅक्सिको, सिंगापूर, इंग्लंडच्या तुलनेत भारतात विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार स्वस्त आणि दर्जेदार आहेत. त्यामुळे देशात वैद्यकीय पर्यटनाला खूप मोठी संधी आहे. २०१९ मध्ये देशातील विविध भागातील रुग्णालयांत जगाच्या विविध भागातून ८ लाख रुग्णांनी येऊन उपचार घेतले, अशी माहिती एस. बी. जैन, इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च संस्थेचे डॉ. श्रीकांत ढाले यांनी दिली. नागपुरात आयोजित ‘इंडियन फार्मास्युटिकल्स काँग्रेस’साठी आले असता ते लोकसत्ताशी बोलत होते.

डॉ. ढाले म्हणाले, देशातील अनेक रुग्णालये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. जगाच्या विविध भागातून देशात उपचाराला येणाऱ्या सर्वाधिक रुग्णांमध्ये हृदय, अस्थिरोग, अवयव प्रत्यारोपनाशी संबंधित रुग्ण असतात. निती आयोगाच्या अहवालानुसार, सध्या हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत १.४४ लाख डॉलर, भारतात ७,९०० डॉलर, कोरियात २८,९०० डॉलर, मॅक्सिकोत २७ हजार डॉलर एवढा खर्च येतो.

जगातील प्रगत वैद्यकीय सेवा असलेल्या देशाच्या तुलनेत भारतात खर्च खूपच कमी असून गुणवत्तापूर्ण आहे. एन्जिओप्लास्टिसाठी अमेरिकेत ५७ हजार डॉलर, कोरियात १५,२०० डॉक्टर, मॅक्सिकोत १२,५०० डॉलर, सिंगापूरला १३,४०० डॉलर, भारतात ५,७०० डॉलर खर्च येतो. हृदयातील व्हॉल्व बदलण्यासाठी अमेरिकेत १.७० लाख डॉलर, कोरियात ४३,५०० डॉलर, मॅक्सिकोत १८,००० डॉलर तर भारतात ५,५०० डॉलर खर्च येतो.

हिप रिप्लेसमेंटसाठी अमेरिकेत ५० हजार डॉलर, कोरिया १४,१२० डॉलर, मॅक्सिकोत १३ हजार डॉलर तर भारतात ७,००० डॉलर खर्च येतो. इतरही विविध प्रकारचे उपचार जगातील इतर प्रगत देशाच्या तुलनेत भारतात स्वस्त आहेत. येथे औषधांसह सर्जिकल साहित्यांची विक्री वाढत असली तरी हे क उपचाराच्या माध्यमातून येथील हॉटेलमध्ये थांबणे, खान- पान, फिरणे, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची साधने वापरण्यासोबतच पर्यटनाला चालना मिळून इतरही क्षेत्राला खूप मोठा लाभ होत असल्याचेही डॉ. ढाले यांनी सांगितले.निम्याहून जास्त रुग्ण बांग्लादेशातीलभारतात प्रामुख्याने बांग्लादेश, म्यानमार, इराक, अफगानिस्थान, टर्कीसह इतरही जवळच्या देशातील रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. त्यापैकी निम्याहून जास्त रुग्ण बांग्लादेश येथील आहेत.

वैद्यकीय पर्यटनात सध्या थायलॅन्ड, मलेशिया, सिंगापूर हे देश भारताशी स्पर्धा करीत आहेत. परंतु हृदय, अस्थिरोग, अवयव प्रत्यारोपणात भारताला सर्वाधिक रुग्ण पसंती देत असल्याचेही डॉ. ढाले यांनी सांगितले.

विविध देशातील उपचाराचे दर (डॉलरमध्ये)
विवरण भारत अमेरिका कोरिया मॅक्सिको
हृदय बायपास ७,९०० १,४४,००० २८,९०० २७,०००
अॅन्जिओप्लास्टि ३,३०० ५७,००० १५,२०० १२,५००
हृदय व्हॉल्व ५,५०० १,७०,००० ४३,५०० १८,०००
मनका शस्त्रक्रिया ६,५०० १,००,००० १५,४०० १२,०००

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 03:09 IST

संबंधित बातम्या