पाच राज्यांच्या निवडणूक व्यूहरचनेवर संघाच्या बैठकीत खल!

गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडताना आगामी निवडणूक काळात संघसंबंधित अन्य संघटनांच्या सहकार्यासंबंधी भूमिका मांडली.

अखिल भारतीय समन्वय बैठकीला नागपुरात सुरुवात, ३६ संघटनांचा सहभाग

नागपूर : इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्गीयांवर वाढलेला आर्थिक भार, कृषी कायद्याला असलेला शेतकऱ्यांचा विरोध, त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात निर्माण होत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात पाच प्रमुख राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपची काय व्यूहरचना असावी, या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. शुक्रवारपासून नागपुरात या बैठकीची सुरुवात झाली.

रेशीमबाग चौकातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात आयोजित या दोनदिवसीय बैठकीचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. या वेळी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सरसहकार्यवाह अरुणकुमार, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी संघाशी संबंधित संघटनांची अशी बैठक होते. त्यात या संघटनांच्या कामाचा आढावा व भविष्यातील कामाची दिशा ठरवली जाते. बैठकीच्या पहिल्या दिवशी संघाची राजकीय शाखा भारतीय जनता पक्ष तसेच विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे संघटन सचिव बी. एल. संतोष, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटनमंत्री विनायक देशपांडे बैठकीत उपस्थित होते.

भारतीय जनता पक्षातर्फे बी.एल. संतोष यांनी गेल्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडताना आगामी निवडणूक काळात संघसंबंधित अन्य संघटनांच्या सहकार्यासंबंधी भूमिका मांडली. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराच्या निर्माणकार्याची माहिती दिली. संघाच्याच भारतीय किसान संघानेही शेतकरी कायद्यात सुधारणेची मागणी के ली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांना तोंड देताना कोणती व्यूहरचना आखायची तसेच लोकांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणती पावले उचलायची याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

शनिवारी संघाशी संबंधित इतर संस्थांचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर रविवारी व सोमवारी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात समन्वय बैठकीत झालेल्या विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. बैठकीत संघ परिवारातील ३६ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

योगी सरकारच्या कामगिरीवर संघ समाधानी!

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीवर संघ समाधानी असून आगामी निवडणुकीत त्यांना मनापासून पाठिंबा देण्याचा निर्णय संघ घेऊ शकतो, तसेच इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे मुंबई महापालिके वर सत्ता आणणे हेसुद्धा महाराष्ट्रातील विद्यमान राजकीय परिस्थिती बघता भाजपसाठी आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही संघाकडून काही सूचना भाजपला दिल्या जाऊ शकतात, असे मत संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी व्यक्त केले.

अफगाणिस्तानचा मुद्दाही चर्चेला?

अफगाणिस्तानमधील अलीकडील घडामोडींवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता बळकावणे सुसंस्कृत राष्ट्रांसाठी योग्य नाही. भारतात काश्मीरमधील दहशतवाद्यांचे मनोबल यामुळे वाढू शकते. या संदर्भात बैठकीत ठराव होण्याची शक्यता संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी वर्तवली. पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा किसान संघाच्या आढावा बैठकीत उपस्थित होऊ शकतो, याकडे देवधर यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रीय मुस्लीम मंचला निमंत्रण नाही?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वय बैठकीपासून संघाशी संबंधित राष्ट्रीय मुस्लीम मंच या संघटनेला दूर ठेवण्यात आले आहे. संघटनेला निमंत्रण देण्यात आले नाही. संघटनेचे नेते इंद्रेशकु मार सध्या दिल्लीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meeting on five states election strategy fuel financial burden to agricultural law akp

ताज्या बातम्या