अमित भगत
युरोपातील महापाषाणीय संस्कृती नवाश्मयुग व ताम्रपाषाणयुगाशी संबंधित असून स्टोनहेंज, कारनॅक तसेच स्पेन, पोर्तुगाल आणि आयर्लंडमधील स्मारके जगप्रसिद्ध आहेत.

भारतात ही संस्कृती उत्तर-वायव्य, दक्षिण आणि ईशान्य भागांत आढळते; विशेषतः दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील विदर्भ येथे तिचे मोठ्या प्रमाणावर अस्तित्व दिसते. ब्रिटिश अधिकारी व इतिहासकारांना आकर्षित करणारा विदर्भाचा हा वारसा आजही तितकाच सुरस व रंजक असूनही तुलनेने अल्पज्ञात आहे.

महापाषाणीय संस्कृती

प्रागैतिहासिक काळात, विशेषतः इ.स.पू. दुसऱ्या-पहिल्या सहस्रकांत, मोठमोठ्या ओबडधोबड दगडांची रचना करून स्मारके उभारण्याची परंपरा असलेल्या समाजाच्या संस्कृतीला महापाषाणीय संस्कृती म्हणतात. या संस्कृतीच्या दफनांच्या विविध पद्धती आढळून येतात, त्यात शिळावर्तुळे (Stone Circles), शिळास्तंभ (Menhir), जमिनीखालील पेटिका-दफने (Cists), शिळाप्रकोष्ठ (Dolmens) इ. चा समावेश होतो.

प्रारंभिक शोध

भारतातील महापाषाण स्मारकांचे स्वरूप आणि त्यांचे वेगळेपण यामुळे सुरुवातीच्या ब्रिटिश शासकांचे लक्ष याकडे वेधले गेले. या स्मारकांचा सर्वप्रथम उल्लेख जरी कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी केला असला, तरी त्यांच्या पद्धतशीर शोधाचे व अभ्यासाचे श्रेय जॉन बॅबिंग्टन यांना दिले जाते. १८१९ मध्ये त्यांनी मलबार भागात शोधकार्य करून केरळमधील दोन शिलावर्तुळांचे उत्खनन केले. बॅबिंग्टन यांनी दाखवलेला मार्ग अनुसरत, पुढे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी महापाषाणयुगीन स्थळांचा शोध घेत याविषयाचा अभ्यास सुरू ठेवला.

विदर्भातील शिळावर्तुळाचा आद्य-अभ्यासक – रेव्हरंड स्टीफन हिस्लॉप १८४४ मध्ये स्कॉटिश मिशनरी म्हणून भारतात आलेल्या स्टीफन हिस्लॉप यांनी येथे जीवशास्त्र, जीवाश्मशास्त्र व भूगर्भशास्त्राच्या अभ्यासासोबत पुरातत्त्व संशोधन सुरू केले. १८४७ च्या सुमारास नागपूरजवळील टाकळघाट येथे त्यांना शिळावर्तुळे, राखयुक्त मृदभांडी, लोखंडी भाला, सुरा आणि इतर वस्तू आढळल्या. त्यांनी अशा २० शिळावर्तुळे व ८ शिलापेटिकांची नोंद केली.

१८४९-५० च्या मोहिमेत सुमारे १०० शिळावर्तुळे त्यांना सापडली. भोसले राजांची परवानगी मिळूनही, मजूर न मिळाल्याने त्यांनी स्वतः मिशनरी व स्थानिक ख्रिश्चनांच्या मदतीने उत्खनन केले, ज्यात मृदभांडी व लोखंडी अवजारे सापडली. या उत्खननाचा सविस्तर अहवाल १८५७ मध्ये मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या पत्रिकेत प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी हिंगणा परिसरातही अशी स्थळे नोंदली गेली; पुढे नागपूरचे मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांनी हिस्लॉप यांना या शिळावर्तुळांवर मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले.

पुढील संशोधनाचा प्रवास

हिस्लॉप यांनी पेटवलेली कुतूहलाची ठिणगी ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये वेगाने पसरली आणि विदर्भातील महापाषाणीय स्थळांच्या उत्खननाला चालना मिळाली. सिरोंचा येथील शिलापेटिकेचे उत्खनन कर्नल ग्लासफर्ड यांनी करून त्याचे अवशेष त्यांनी हिस्लॉप यांना पाठवले.

विदर्भातील पहिले शास्त्रशुद्ध उत्खनन १८६७ मध्ये बेरार प्रांताचे आयुक्त जॉन हेन्री रिवेट-कर्नाक यांनी नागपूरचे आयुक्त आल्फ्रेड लायल व जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांच्या सहकार्याने नागपूरजवळील जुनापानी येथे केले, ज्यात लोखंडी बाण, भाले, कुऱ्हाडी व इतर अवजारे सापडली. त्याच काळात मेजर जी.जी. पीअर्स यांनी वरेगाव येथे उत्खनन करून मानवी अवशेष, लोखंडी हत्यारे व तांब्याचे दागिने मिळवले, जे आज लंडनच्या ब्रिटिश संग्रहालयात जतन आहेत.

पुढील काळात मध्य प्रांताचे तत्कालीन मुख्य आयुक्त सर जॉन हेन्री मॉरिस यांच्या आग्रहावरून, १८६९ मध्ये जे.जे. कॅरी यांनी खैरवाडा येथे उत्खनन केले आणि सुमारे १५० शिलावर्तुळांचे दस्तऐवजीकरण पूर्ण केले. १८७१ मध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) विभागाची स्थापना झाल्यानंतर, सर अलेक्झांडर कनिंगहॅम, हेन्री कझिन्स आणि जी.ए.पी. हंटर यांनी विविध महापाषाणीय स्थळांची नोंद केली; यामध्ये विशेषतः १९३३ मधील माहूरझरी येथील संशोधन अत्यंत उल्लेखनीय ठरते.

स्वातंत्र्यानंतरचा संशोधनाचा प्रवास

स्वातंत्र्योत्तर काळात विदर्भातील महापाषाणीय स्थळांचे पहिले उत्खनन १९६१-६२ मध्ये थापर यांनी जुनापानी येथे केले. प्रारंभी संशोधन दफनभूमी व मृतदेहासोबत ठेवलेल्या वस्तूंवर केंद्रित होते; परंतु १९७० नंतर ते वसाहती आणि जीवनपद्धतीच्या अभ्यासाकडे वळले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॉ. शां.भा. देव आणि इतर संशोधकांनी दफन पद्धती, तंत्रज्ञान, उदरनिर्वाह, वसाहत रचना व सामाजिक-आर्थिक जीवन यांचा सखोल अभ्यास केला.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, महाराष्ट्र शासनाचा पुरातत्त्व विभाग, नागपूर विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेज यांनीही या क्षेत्रात व्यापक संशोधन केले आहे. या एकत्रित प्रयत्नांतून विदर्भात १५० हून अधिक महापाषाणीय स्थळांची नोंद झाली असून, त्यांपैकी २५ हून अधिक स्थळांचे यशस्वी उत्खनन झाले आहे.

महापाषाणकालीन जीवन आणि संस्कृती

नैकुंड, भागीमहारी व खैरवाडा येथे वसाहतींसह दफनस्थळे आढळतात, तर काही ठिकाणी केवळ दफने आहेत. हे लोक केवळ भटके नसून तलाव बांधणी व भातशेतीत प्रगत होते. नागपूरजवळील नैकुंड व भागीमहारी येथे गोल झोपड्या, लोखंड गाळण्याच्या भट्ट्या आणि गहू, तांदूळ, जव, वाटाणा यांसारख्या धान्यांचे पुरावे सापडतात, ज्यावरून ही संस्कृती कृषिप्रधान व तांत्रिकदृष्ट्या विकसित होती असे दिसते.

भौतिक संस्कृती आणि तांत्रिक प्रगती

महापाषाणीय दफनांमध्ये लोखंडाचा व्यापक वापर, काळी-तांबडी मृदभांडी (Black and Red Ware) आणि तांबे, कांस्य व सोन्याचे दागिने प्रामुख्याने आढळतात. माहूरझरी येथील उत्खननातून भाले, कट्यारी, कुऱ्हाडी, सोन्याची कर्णफुले आणि घोड्यांचे तांब्याचे अलंकार प्राप्त झाले आहेत. हे अवशेष त्यांच्या प्रगत धातुकौशल्याचे आणि सामाजिक प्रतीकवादाचे निदर्शक आहेत. तसेच, नैकुंड येथील लोहभट्ट्यांमुळे (Iron Smelting Furnaces) त्यांचे प्रगत लोह-तंत्रज्ञान स्पष्ट होते.

मृत्यूसंस्कार आणि प्रतीकवाद

मृतदेह उघड्यावर ठेवून नंतर शिळावर्तुळात दफन करण्याची पद्धत प्रचलित होती; काही ठिकाणी अग्नीसंस्कार व प्रतीकात्मक दफनाचेही पुरावे आढळतात. घोड्यांचे अवशेष त्यांच्या धार्मिक-सामाजिक महत्त्वाचे द्योतक असून रायपूर व उबाळी येथील पुराव्यांवरून घोड्यांचा विधिपूर्वक वध व दफन होत असल्याचे ठोस संकेत मिळतात. वैदिक अश्वमेधाशी काही प्रमाणात साधर्म्य दिसून येत असले तरी हा विधी मुख्यतः मृत्यूसंस्काराशी निगडित प्रतीकात्मक स्वरूपाचा होता.

सामाजिक संरचना

एकाच स्मारकात अनेक व्यक्तींचे अवशेष आढळल्याने सामूहिक दफन किंवा स्मारकाचा पुनर्वापर होत असल्याचे दिसते. माहूरझरी येथे काही सांगाडे पाषाणवर्तुळाबाहेर कोणत्याही विधीशिवाय सापडणे, हे सामाजिक श्रेणी, विषमता आणि गुंतागुंतीच्या रचनेचे द्योतक मानले जाते.

समारोप

त्यामुळे महापाषाणीय संस्कृतीकडे केवळ ‘दफनसंस्कृती’ म्हणून पाहणे अपुरे ठरते. ती एक विकसित, संघटित आणि प्रतीकांनी समृद्ध अशी जीवनपद्धती होती, ज्यात मृत्यू, श्रद्धा आणि सामाजिक वास्तव यांचे गुंतागुंतीचे परस्परसंबंध प्रतिबिंबित होतात. विदर्भातील या शिळावर्तुळांमध्ये दडलेली ही कहाणी अजून पूर्णपणे उलगडलेली नाही, आणि म्हणूनच तिचा शोध अद्याप सुरूच आहे.

अमित भगत
amit_264@yahoo.co.in