बुलढाणा : मेहकर परिसरात झालेल्या क्रूर हत्येचा उलगडा झाला असून पत्नीला त्रास देणाऱ्या युवकाची पतीने हत्या केल्याचे उघड झाले आहे. यातील मृत व आरोपी वाशीम जिल्ह्यातील असून आरोपीला मेहकर पोलिसांनी जेरबंद केले आहे. तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना काल ४ मार्च रोजी मेहकरच्या एमआयडीसी परिसरात उघडकीस आली होती. दरम्यान घटनेनंतर मेहकर पोलिसांनी वेगाने तपास करीत अवघ्या १२ तासांत आरोपीचा शोध लावला आहे.

आरोपीला त्याच्या शेतातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने हत्येची कबुली दिली असून पत्नीला त्रास देत असल्याने आपण हत्या केल्याचे त्याने सांगितले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि पथकांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वी ठरली. मेहकर पोलिसांना एमआयडीसी परिसरातील शेतात ४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता एका पुरुषाचे मृतदेह पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर एस. आलेवार यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले.

मृताची ओळख राहुल भानुदास बाजड (वय २८, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) अशी पटली. घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी चार स्वतंत्र पथके विविध दिशांनी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले. तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी केनवड (ता. रिसोड, जि. वाशीम) येथून ओम शामराव केनवडकर (वय ३६) याला त्याच्या शेतातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मृतक राहुल हा आरोपीच्या पत्नीस काही दिवसांपासून त्रास देत होता. वारंवार समज देऊनही तो न ऐकल्याने ३ मार्च रोजी त्याला खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरातील शेतात नेऊन दगडाने मारहाण करून खून केल्याचे आरोपीने सांगितले. या प्रकरणी फिर्यादी संजय किसन वाघ (वय ४०, रा. जांब आढाव, ता. रिसोड, जि. वाशीम) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, अशोक अवचार, उपनिरीक्षक गणेश कड, कांचन जारवाल तसेच मेहकर व सायबर पोलिस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. अवघ्या काही तासांत खुनाचा उलगडा केल्याने मेहकर पोलिसांचे कौतुक होत आहे. पुढील तपास सुरू आहे.